मुंबई : ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले त्यांची अवस्था आज ना घर का ना घाट का अशी झाली आहे. स्वबळावर निवडणूक लढण्याची आज ते भाषा करतात. त्यासाठी मनगटात ताकद लागते. घरात बसून निवडणूक लढता येत नाही, असा टोला उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावत महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वांद्रे कुर्ला संकुलात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दुप्पट वेगाने चौपट काम हा मंत्र एकनाथ शिंदे यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात एकदाही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांच्यावर जोरदार टीकस्त्र सोडलं. रामदास कदम यांच्या एका मुलाखतीतीचा संदर्भ देऊन शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, त्यांची अवस्थाा काय झाली आहे बघा. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. धनुष्यबाण आपल्याकडं आलं. बाळासाहेबांची शिवसेना आपल्याकडे आली. शिवसेना, धन्युष्यबाण वाचविण्याचे काम केलं. जनतेनं निवडणुकीत त्यांना जागा दाखवून दिली. मग ते म्हणाले, जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवू. पण, जनतेनं त्यांचा उरला सुरला नक्शा उतरविला.
बाळासाहेबांच्या विचारांचे मारक, ते काय बांधणार स्मारक : एकनाथ शिंदे म्हणाले, ते आज स्वबळावर निवडणूक लढणार म्हणतात. त्यासाठी मनगटात ताकद लागते. घरात बसून निवडणूक लढविता येत नाही. त्यासाठी फिल्डवर यावं लागतं. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले. त्यांना आम्ही बोलाविणार नाही, असं ते म्हणाले होते. पण, बाळासाहेबांच्या विचारांचे मारक, ते काय बांधणार स्मारक, अशी परिस्थिती आज आहे. बाळासाहेबांचे विचार सोडण्याचे पाप तुम्ही २०१९ मध्ये केलं. बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी त्यांनी नाक घासून बाळासाहेबांची मााफी मागायला हवी होती, असा टोला शिंदे यांनी लगावला.
आपला गॉडफादर कोण : ज्या शिवसैनिकांनी आपल्याला मोठं केलं, तो आपला प्रचार करतो. तो आपल्याला निवडून आणतो. तो संकटात असेल, त्यावेळी आपण त्याच्या पाठीशी उभे राहिलं पाहिजे, हे आपण पाळलं पाहिजे. सर्वात मोठे पद हे शिवसैनिक आहे. आपल्याला कोणी गॉडफादर नाही. बाळासाहेबांचे विचार, दिघेसाहेबांची शिकवण आणि शिवसेना हा चार अक्षरी मंत्र, हेच आपले गॉडफादर आहेत, हेच लक्षात ठेवायचं आहे.
डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन : मी आजही कार्यकर्ता आहे, कालही कार्यकर्ता होतो. पदाचा मोह कधीच नव्हता. लालसा कधीच नव्हती. ज्या २ कोटी ४० लाख बहिणींनी मला ओवाळले. त्या बहिणींचा सख्खा भाऊ म्हणून ओळख मिळाली. ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. खुर्चीची लालसा कोणाला आहे. आपल्याला कधीच नव्हती. तत्त्वासाठी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारून बाहेर पडणारे आपण आहोत. जिनके इरादे बुलंद होते है, वोही चट्टानो को गिराते है, और जो तुफानो मे पलते है वोही दुनिया हिलाते है. आपल्याला स्वाभिमान महत्त्वाचा आहे. स्वाभिमान बाळासाहेबांनी शिकविला आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. त्यात किती वर्षांचे काम केलं, त्याचं मोजमाप जनतेनं करायचं आहे. लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. पण, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आज डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणूस हीच आपली ओळख आहे.
आमचा स्ट्रईक रेट त्यांच्यापेक्षा जास्त : लोकसभेत फेक नरेटीव्ह पसरवून मते मिळविली. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली. तरीही शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा जास्त होता. त्यांच्यापेक्षाा २ लाख मतं जास्त मिळाली. या विधानसभेत १५ लाख मतं जास्त मिळाली. तुम्ही ९७ जागा लढवून २० जागा जिंकल्या. आपण ८० जागा लढवून ६० जागा जिंकल्या. आता सांगा खरी शिवसेना कोणाची आणि बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण, असा सवाल शिंदे यांनी केला.
महापालिका ते ग्रामसभा काबीज करायच्या आहेत : अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, अभी तो पुरा आसमान बाकी है. आता महापालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. मागच्या वेळी आपण ग्रामसभा ते विधानसभा असा नारा दिला होता. आता महापालिका ते ग्रामसभा आपल्याला काबीज करायची आहे. आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला असाच लखलखीत विजय मिळवायचा आहे.
शक्तिशाली शिवसेना उभी करणे हेच आपले टार्गेट : पुढील वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे आहे. या वर्षात शिवसेना महाराष्ट्राच्या घराघरात आणि लोकांच्या मनामनात पोहोचवायची आहे. गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक हे आपले मिशन आहे. त्यासाठी सदस्य नोंदणी करा. ऐतिहासिक शिवसेनेची नोंदणी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक राज्यात शिवसेनेची मागणी होत आहे. हे आपल्यासाठी भूषणावह आहे. महाराष्ट्राला समृद्ध करणारी, मराठी अस्मिता जपणारी, अन्यायाला धुडकाविणारी शक्तीशाली शिवसेना उभी करणे, हेच आपले टार्गेट आहे. मनगटात १२ हत्तींचे बळ असलेल्या शिवसैनिकांना काहीच अशक्य नाही.
हेही वाचा :