मुंबई : आपली तयारी झाली असं दिसेल त्यावेळी कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार निर्णय घेणार, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकलंय. शिवसैनिकांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेणार असं सांगत त्यांनी स्वबळाचे संकेत दिले.
मराठी माणसाच्या नादी लागू नका : "तुम्ही भ्रमात राहू नका. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शाह किस झाड की पत्ती," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना टोला लगावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
अमित शाहांवर हल्लाबोल : दोन महिन्यांपूर्वी निवडणुकांचा जो काही निकाल लागला, मला तो पटलेला नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. "तसंच मधे अब्दाली येऊन गेले, कोण तुम्हाला माहीत आहे अमित शाह. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला विजय उद्धव ठाकरेंना जागा दाखवणारा आहे. जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय असतो ते तुम्हाला भविष्यात दिसेल," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना उत्तर दिलं.
मी माझं पक्षप्रमुख पद सोडणार : "ज्यादिवशी माझा निष्ठावंत शिवसैनिक म्हणेल की उद्धव तू बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत त्याक्षणी मी माझं पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही. हार-जीत होत असते. पण मूळात हा विजय भाजपाच्या अनेक लोकांना पचलेला नाही. काहीतरी गडबड घोटाळा नक्की आहे, ईव्हीएमचा तर नक्कीच आहे. ज्या अमित शाह यांनी संपूर्ण सरकारी यंत्रणा वापरुन अडीच वर्षे घटनाबाह्य सरकार लादलं ते असातसा महाराष्ट्र सुटू देतील?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
हेही वाचा -