हैदराबाद Tanmay Agarwal Record Innings : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला जातोय. इथून थोड्याच अंतरावर असलेल्या नेक्सजेन क्रिकेट मैदानावर रणजी करंडक फेरीच्या चौथ्या सामन्यादरम्यान एक नवीन विक्रम केला गेलाय. हैदराबाद आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात हैदराबादचा सलामीवीर तन्मय अग्रवालनं अवघ्या 147 चेंडूत त्रिशतक झळकावून इतिहास रचलाय. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक झळकावण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केलाय.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान तिहेरी शतकाचा जागतिक विक्रम : तन्मयनं धडाकेबाज फलंदाजी करत 160 चेंडूत 33 चौकार आणि 21 षटकारांच्या मदतीनं नाबाद 323 धावा करत राहुल सिंगसोबत पहिल्या विकेटसाठी 449 धावांची भागीदारी केली. या सामन्यात त्यानं 147 चेंडूत त्रिशतक पूर्ण केलं, जे प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद त्रिशतक आहे. 28 वर्षीय तन्मयनं 147 चेंडूत त्रिशतक झळकावत बॉर्डर आणि वेस्टर्न प्रोव्हिन्स यांच्यातील सामन्यात 191 चेंडूत त्रिशतक झळकावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या मार्को माराईसचा विक्रम मोडीत काढलाय.
एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम : तन्मयनं आपल्या या खेळीमध्ये 21 गगनचुंबी षटकार ठोकले. यासह तो आता रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनलाय. त्यानं इशान किशनचा (14 षटकार) विक्रम मोडलाय.