पॅरिस Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय नेमबाज अवनी लेखारानं धमाकेदार कामगिरी केली आहे. अवनीनं शुक्रवारी (30 ऑगस्ट) महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. अवनीनं पॅरालिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकलं. तर याच स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालनं कांस्यपदक जिंकलं. या दोन पदकांसह सध्या सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचं खातं उघडलं आहे. भारताकडे एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक आहे.
अवनीचा पॅरालिम्पिक विक्रम : अवनीनं अंतिम फेरीत 249.7 गुण मिळवले, हा पॅरालिम्पिक विक्रम आहे. तर कांस्यपदक विजेत्या मोनानं 228.7 गुण मिळवले. अवनीनं टोकियो पॅरालिम्पिक (2020) मध्येही याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. म्हणजेच तिनं आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या ली युनरीनं रौप्यपदक पटकावलं. अवनीनं टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. अवनी लेखरा ही पात्रता फेरीत दुसरं स्थान मिळवून अंतिम फेरीत धडक मारण्यात यशस्वी ठरली. गेल्या वर्षभरापासून जबरदस्त फॉर्मात असलेली मोना अग्रवालही पाचव्या स्थानावर राहून आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. गतविजेत्या अवनीनं 625.8 गुण मिळवले आणि ती इरिना शेटनिकच्या मागे होती. इरिनानं पॅरालिम्पिक पात्रता फेरीत 627.5 गुणांसह नवा विक्रम प्रस्थापित केला.