पुणे : संपूर्ण जगभरात कोरोनाच्या महामारीनं हाहाकार माजवला होता. चीनमधून कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा चीनवर संपूर्ण जगाचं लक्ष गेलं आहे. कारण चीनमध्ये आता नव्या HMPV व्हायरसनं डोकं वर काढलंय. चीनमध्ये बऱ्याच लोकांना ह्युमन मेटान्यूमो व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळं आता कोरोनानंतर जग दुसऱ्या महामारीच्या उंबरठ्यावर आहे का? अशी भीती संपूर्ण जगभरात पसरली आहे. याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे (Dr Avinash Bhondwe) यांनी लोकांना अजिबात घाबरू नका, असं आवाहन केलंय.
"चीनमध्ये मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (HMPV) संसर्ग वेगानं वाढल्यानंतर भारतात देखील रुग्ण दिसून येत आहेत. देशात विविध राज्यात एचएमपीव्हीची लागण होत असल्यानं याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. चीनमध्ये असलेला मेटान्यूमो व्हायरस (HMPV) जुना असून घाबरून जाण्याचं कोणताही कारण नाही. जरी याची तुलना कोरोना व्हायरसची केली जात असली तरी, लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊच शकत नाही". - डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए
कोरोनासारखी परिस्थिती नाही : डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, "HMPV व्हायरस बाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू असून काही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत. कोरोना हा नवीन विषाणू होता आणि याबाबत कोणालाच काही माहीत नव्हतं. त्यामुळं लॉकडाऊन आणि भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या व्हायरसबाबत २००१ सालापासून वैद्यकीय लोकांना माहिती असून घाबरून जाण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. तसंच हा विषाणू इतका कॉमन आहे की, १९५० पासून गेल्या ७० वर्षात याच्या अनेक देशात अनेक साथी येऊन गेल्या आहेत आणि याची कधीही महामारी आलेली नाही."
भारतीय तज्ज्ञांनी सांगितलं काय सांगितलं? : थंडीच्या दिवसात जो काही थंडी, ताप हा आजार होतो, यातील १० टक्के रुग्ण हे या मेटान्यूमो व्हायरसचे असतात असं भारतीय तज्ञांनी सांगितलं आहे. ५ वर्षाखालील मुलं ते ६५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना हा आजार होतो. तसंच ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांना हा आजार होतो. तसंच याची लक्षणं ही नेहमीच्या सर्दी, खोकला, ताप यासारखी आहेत. यात बरं होण्याचं प्रमाण हे ९९ टक्के आहे. तसंच कोणीही घाबरून जाऊ नये. ज्यांना कोणाला सर्दी, खोकला, ताप आला असेल अशा लोकांनी नियमित औषधोपचार घ्यावं असं भोंडवे यांनी सांगितलं.
हेही वाचा -