पॅरिस (फ्रान्स) Paris Olympics 2024 Badminton : भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेननं पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या गट टप्प्यातील सामन्यात सेननं ग्वाटेमालाचा खेळाडू कॉर्डन केविनचा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट 21-8 असा सहज जिंकल्यानंतर सेनला दुसऱ्या सेटमध्ये चुरशीचा सामना करावा लागला. पण, सेननं दुसरा सेट 22-20 असा जिंकून सामना जिंकला.
सेननं पहिला सेट 21-8 असा जिंकला : पॅरिसमध्ये पदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार असलेल्या 22 वर्षीय भारतीय खेळाडूनं सामन्यात वेगवान सुरुवात केली आणि पहिल्या सेटमध्ये आपल्या 37 वर्षीय प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी दिली नाही. सेननं चमकदार कामगिरी करत पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत 11-3 अशी आघाडी घेतली. यानंतरही त्यानं आपली कामगिरी कायम ठेवत पहिला सेट 21-8 असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये रोमांचक सामना : दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला ग्वाटेमालाचा खेळाडू कॉर्डन केविननं शानदार पुनरागमन करत सेनवर 6-2 अशी आघाडी घेतली. सेननं या सेटमध्ये अनेक चुका केल्या आणि अनेक वेळा शटल नेटमध्ये मारलं. या सेटमध्ये केविननं भारतीय खेळाडूवर वर्चस्व गाजवलं आणि मध्यांतरापर्यंत सेन 11-6 असा पिछाडीवर पडून जोरदार पुनरागमन केलं. या सेटमध्ये ग्वाटेमालाच्या 37 वर्षीय खेळाडूनं सेनवर मात केली.
शानदार पुनरागमन करत विजय : मध्यांतरात पिछाडीवर पडल्यानंतर सेननं खेळात शानदार पुनरागमन केलं. या सेटमध्ये लक्ष्यला कठीण आव्हानाचा सामना करावा लागला. पण, जागतिक क्रमवारीत 18व्या क्रमांकावर असलेला भारतीय खेळाडू लक्ष्य सेननं 41व्या मानांकित ग्वाटेमालाच्या कॉर्डन केविनचा 22-20 असा पराभव करुन सामना जिंकला.
हेही वाचा :
- पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी नेमबाजांनी चुकवला 'निशाणा'; सरबजोत सिंगला अंतिम फेरीची थोडक्यात हुलकावणी - Paris Olympics 2024
- मनू भाकरचा नेमबाजीत अचूक 'निशाणा'; 10 मीटर एअर पिस्तूल महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश, देशाला मिळणार पहिलं पदक? - Paris Olympics 2024