पॅरिस Paris Olympics 2024 Shooting : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दुसऱ्या दिवशी (28 जुलै) भारतीय खेळाडू विविध खेळात आपली छाप पाडत आहेत. आता बॅडमिंटन आणि रोइंगनंतर आता नेमबाजीत भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अव्वल नेमबाज रमिता जिंदालनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. 60 शॉट्सच्या पात्रता फेरीत रमिता एकूण 631.5 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिली. रमितानं पहिल्या सिरीजमध्ये 104.3, दुसऱ्यामध्ये 106.0, तिसऱ्यामध्ये 104.9, चौथ्यामध्ये 105.3, पाचव्यामध्ये 105.3 आणि सहाव्यात 105.7 गुण मिळवले. या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या (29 जुलै) होणार आहे.
इलाव्हेलिन वालारिवनची निराशाजनक कामगिरी : रमितासह एलावेलिन वालारिवान हिनं देखील महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत भाग घेतला होता. परंतु तिनं निराश केलं. वालारिवन 630.7 गुणांसह 10व्या स्थानावर राहिली. वलारिवनची एका क्षणी अंतिम फेरी गाठण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु होती. मात्र शेवटच्या काही शॉट्समध्ये तिला आपला वेग कायम राखता आला नाही. यात टॉप 8 नेमबाजांनी पात्रता फेरीत स्थान मिळवलं आहे.