केपटाऊन SA vs PAK 2nd ODI : पाकिस्तान क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा वनडे सामनाही जिंकला आहे. यासह त्यांनी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. म्हणजे त्यांनी वनडे मालिका काबीज केली आहे. आता पाकिस्ताननं तिसरा वनडे हरला तरी मालिका त्यांचीच राहणार आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 81 धावांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी एक मौल्यवान विक्रमही आपल्या नावावर केला. पाकिस्तानचा हा विक्रम दक्षिण आफ्रिकेतील सर्वात यशस्वी संघ होण्याच्या विजेतेपदाशी निगडीत आहे.
पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेत सर्वात यशस्वी संघ :मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेत केलेल्या पराक्रमानंतर, त्या भूमीवर द्विपक्षीय वनडे मालिका जिंकणारा तो सर्वात यशस्वी परदेशी संघ बनला आहे. यावेळी पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेतील तिसरी द्विपक्षीय वनडे मालिका जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेतील सर्वात यशस्वी संघ होण्यासाठी पाकिस्तानची सुरुवात 11 वर्षांपूर्वी 2013 मध्ये झाली, जेव्हा त्यांनी तिथं पहिली द्विपक्षीय वनडे मालिका जिंकली. त्यानंतर, 2021 मध्ये दुसऱ्यांदा वनडे मालिका जिंकली आणि आता 2024 मध्ये तिसऱ्या वनडे मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली.
बाबर-रिजवानची गेमचेंजर भागीदारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 329 धावा केल्या. बाबर आणि रिझवान यांच्यात 23.3 षटकांत 4.89 च्या धावगतीनं झालेल्या 115 धावांच्या भागीदारीशिवाय, कामरान गुलामच्या झटपट अर्धशतकानंही पाकिस्तानला एवढी मोठी धावसंख्या गाठण्यात मोठी भूमिका बजावली. बाबर आझमनं 73 धावा, मोहम्मद रिझवाननं 80 धावा केल्या, तर कामरान गुलामनं 196 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं 63 धावा केल्या.