कराची Pakistan Head Coach : पाकिस्तान क्रिकेटमध्ये काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी होत आहेत. अलीकडेच बाबर आझमच्या जागी मोहम्मद रिझवानला मर्यादित षटकांचा कर्णधार बनवण्यात आलं. यानंतर आता लगचच दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. कर्स्टन यांच्या प्रशिक्षणातच भारतीय संघाने 2011 च्या वनडे विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं होतं. ते उत्कृष्ट रणनीती बनवण्यासाठी ओळखला जातात. मात्र त्यांचा पाकिस्तानसोबतचा कार्यकाळ फार काळ टिकला नाही.
8 महिन्यांत दिला राजीनामा : गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या ODI आणि T20 संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. एप्रिल 2024 मध्येच कर्स्टन यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते या पदावर केवळ 8 महिने राहू शकले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अलीकडेच प्रशिक्षकाकडून निवडीचे अधिकार काढून घेतले होते आणि त्यांना निवड समितीचा भागही बनवण्यात आलं नव्हतं. मात्र, कर्स्टन यांच्याकडून अद्याप कोणतंही वक्तव्य आलेलं नाही.
2024 च्या T20 विश्वचषकात पाकिस्तानी संघ चांगली कामगिरी करु शकला नाही : पाकिस्तानच्या नवीन निवड समितीमध्ये सध्या आकिब जावेद, अलीम दार, अझहर अली, असद शफीक आणि हसन चीमा यांचा समावेश आहे, तर प्रशिक्षक आणि कर्णधार यांना हटवण्यात आलं आहे. कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखाली पाकिस्तानी क्रिकेट संघ 2024 च्या T20 विश्वचषकात चांगली कामगिरी करु शकला नाही आणि संघाला साखळी सामन्यातूनच बाहेर पडावं लागलं. यानंतर बाबर आझमनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मोहम्मद रिझवानला पाकिस्तानचा नवा मर्यादित षटकांचा कर्णधार बनवण्यात आलं आहे.
जेसन गिलेस्पी मर्यादित षटकांचे प्रशिक्षक : मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे दौऱ्यावर एकदिवसीय आणि T20 मालिका खेळणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं गॅरी कर्स्टन यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तर जेसन गिलेस्पी आता पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूच्या दौऱ्यावर पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद भूषवणार आहे. आगामी काळात पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चंही आयोजन करायचं आहे. बऱ्याच काळानंतर पाकिस्तानला ICC स्पर्धांचं यजमानपद मिळालं आहे.
हेही वाचा :
- पाकिस्तानविरुद्ध मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानं कर्णधाराविना जाहीर केला संघ; विश्वविजेत्या कर्णधाराला T20 संघात स्थान नाही