मेलबर्न Pakistan Announced Playing 11 : पाकिस्तान क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तानी संघ या दौऱ्यावर तीन वनडे आणि तीन T20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिला वनडे सामना सोमवार 4 नोव्हेंबर रोजी मेलबर्नमध्ये खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियापाठोपाठ पाकिस्तानी संघानंही या सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पाकिस्ताननं नुकतंच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला होता. त्या मालिकेत त्यांनी इंग्लंडचा 2-1 नं पराभव केला होता. यामुळं पाकिस्तन संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
दिग्गज खेळाडूंचं पुनरागमन : या सामन्यात पाकिस्तान संघासाठी बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांचं पुनरागमन झालं आहे. ज्यामुळं मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ मजबूत झाला आहे. यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान संघाचं नेतृत्व करेल, तर आगा सलमान उपकर्णधार असेल. यासोबतच सॅम अयुब आणि मोहम्मद इरफान खान हे दोन युवा खेळाडूही पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत.
रिझवानची कर्णधार म्हणून नियुक्ती : अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मोहम्मद रिझवानची वनडे आणि T20 फॉरमॅटचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती आणि त्याची ही पहिली लिटमस टेस्ट असणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार पदार्पण करणाऱ्या कामरान गुलामचाही पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला असून पाकिस्तानी चाहत्यांची नजर पुन्हा एकदा त्याच्यावर असेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 108 वनडे सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियानं या हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्यामध्ये त्यांनी 70 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला 34 सामन्यांमध्ये यश मिळालं आहे. याशिवाय ३ सामन्यांचा निकाल लागला नाही, तर एक सामना बरोबरीत संपला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पाकिस्तानची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे. पाकिस्ताननं इथं खेळल्या गेलेल्या 56 एकदिवसीय सामन्यांपैकी केवळ 17 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला काहीतरी लक्षणीय कामगिरी करावी लागणार आहे.