हॅमिल्टन New Zealand Biggest Win :हॅमिल्टन इथं खेळल्या गेलेल्या न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान कीवी संघानं इंग्लंडचा तब्बल 423 धावांच्या मोठ्या फरकानं एकतर्फा पराभव केला. या सामन्यातील विजयासह न्यूझीलंडनं आपला क्लीन स्वीप वाचवला. यासोबतच इंग्लंडनं तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात कीवी संघानं निश्चितच विक्रमी कामगिरी केली. या सामन्यासह त्यांनी आपला सहकारी टीम साऊथीला क्रिकेटमधून भव्य निरोप दिला. टीम साऊदीनं इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीनंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा आधीच केली होती.
न्यूझीलंडचा सर्वात मोठा विजय : वास्तविक, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. कीवी संघानं मालिकेतील शेवटचा सामना 423 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला. पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडनं मालिका जिंकली. हा सामना टीम साऊदीचा शेवटचा कसोटी सामना होता. या सामन्यात त्यानं 2 बळी घेतले. त्याच वेळी, धावांच्या बाबतीत न्यूझीलंडचा हा सर्वात मोठा संयुक्त विजय ठरला. यापूर्वी एकदा न्यूझीलंडनं 2018 मध्ये श्रीलंकेचा 423 धावांच्याच फरकानं पराभव केला होता.
इंग्लंडचा पहिला डाव गडगडला : तिसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंड संघाचा कर्णधार बॅन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडनं पहिल्या डावात 347 धावा केल्या, त्यात मिचेल सँटनरनं 76 धावा, टॉम लॅथमनं 61 आणि केन विल्यमसननं 44 धावा केल्या. इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्सनं चार विकेट घेतल्या. यानंतर इंग्लंडचा संघ 143 धावांवर गडगडला. मॅट हेन्रीनं 4 तर विल ओ'रुर्क आणि मिचेल सँटनरनं प्रत्येकी 3 बळी घेतले.