हैदराबाद Arshad Nadeem Pakistan : अर्शद नदीम ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पाकिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यानं 92.97 मीटर फेक करुन ऑलिम्पिक विक्रम मोडला आणि सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवलं. यासह अर्शदनं पाकिस्तानचा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा 32 वर्षांचा दुष्काळ संपवला. यानंतर पाकिस्तान कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी सांगितलं की, पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये आमंत्रित करताना मला आनंद होईल.
ड्रेसिंग रुममध्ये येण्याचं आमंत्रण :गिलेप्सी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) पॉडकास्टमध्ये म्हणाले, 'आम्हाला अर्शद नदीमला ड्रेसिंग फॉर्ममध्ये बोलवायला आवडेल. त्याचं ड्रेसिंग रुममध्ये येणं आणि सुवर्णपदक सामायिक करणं हे संघाला प्रोत्साहन देणारं ठरेल. विशेषत: ऑलिम्पिक अजूनही चर्चेत असताना. हा एक चांगला क्षण असेल आणि मी त्याला आमच्या ड्रेसिंग रुममध्ये येण्याचं खुलं आमंत्रण देतो. अर्शदची संघातील खेळाडूंसोबतची भेट त्यांच्या आत्मविश्वासासाठी चांगली ठरेल,' असा विश्वास पाकिस्तान कसोटी संघाच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.