सिडनी Most Test Wickets In Series : भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात सतत धुमाकूळ घालत आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर एकापाठोपाठ एक विक्रम बनवल्यानंतर बुमराहनं आता आणखी एक विक्रम केला आहे. जसप्रीत बुमराह आता ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. या बाबतीत त्यानं माजी फिरकीपटू बिशनसिंग बेदींना मागं टाकलं आहे. सिडनी कसोटीत मार्नस लॅबुशेनला बाद करताच बुमराहच्या नावावर ही मोठी कामगिरी नोंदवण्यात आली आहे.
बुमराहनं रचला इतिहास : जसप्रीत बुमराह आता ऑस्ट्रेलियातील कोणत्याही कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराहनं 32 विकेट घेतल्या आहेत. 32वी विकेट म्हणून मार्नस लॅबुशेन त्याचा बळी ठरला. बुमराहनं लॅबुशेनची विकेट घेताच इतिहास रचला. याआधी बुमराहनं सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजाची विकेट घेत असताना बिशन सिंग बेदींच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
बिशन सिंग बेदींचा 47 वर्षे जुना विक्रम मोडला : बुमराहच्या आधी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम महान आणि दिवंगत फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदींच्या नावावर होता. 1977-78 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर त्यांनी संपूर्ण मालिकेत 31 विकेट घेतल्या होत्या. मात्र सिडनी इथं खेळल्या जात असलेल्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बुमराहनं हा विक्रम मोडीत काढला.
कसोटीत 200 हून अधिक विकेट : या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या सुरुवातीपासून जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्रास दिला आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं 5 विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्यानं तीन विकेट्स घेतल्या. यानंतर बुमराहनं ॲडलेड कसोटीत चार विकेट घेतल्या. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात बुमराहनं 9 विकेट घेतल्या होत्या. मेलबर्नमधील चौथ्या कसोटीतही या गोलंदाजानं 9 विकेट्स घेतल्या होत्या. आता बुमराहनं सिडनी कसोटीत आणखी 2 यश मिळवून इतिहास रचला आहे. या दौऱ्यात बुमराहनं 200 कसोटी बळीही पूर्ण केले आहेत. आता त्यानं 45 कसोटीत एकूण 205 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा :
- 'मी दोन मुलांचा बाप...' रोहित शर्माचं निवृत्तीवर भाष्य, टीकाकारांनाही चोख प्रत्युत्तर
- 18 वर्षांनंतर पाहुण्यांचा संघ आफ्रिकेत सामना जिंकत टीम इंडियाला मदत करणार? 'इथं' पाहा निर्णायक मॅच लाईव्ह