बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे. २९ नोव्हेंबरला वाल्मिक कराड यानं आवादा कंपनीकडं खंडणी मागितली असल्याचा आरोप होत आहे. त्याच दिवशी वाल्मिक कराड हा विष्णू चाटेच्या केजमधील कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराडसोबत सुदर्शन घुले, प्रतिक घुले हे सोबत असल्याचं फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे.
सर्व आरोपी होते एकत्र : 29 नोव्हेंबर 2024 चा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी हे विष्णू चाटेच्या केजमधील कार्यालयात एकत्र आल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यानं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटीची खंडणी मागितल्याचां उल्लेख आहे. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा समजला जात आहे.
आमदार सुरेश धसांचा हल्लाबोल : वाल्मिक कराड हा 29 नोव्हेंबरला केजमध्ये होता याचा हा पुरावा देखील आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणातील काही आरोपी यामध्ये दिसत आहेत. याबाबत आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळंके यांनीही जोरदार टीका केली. या सीसीटीव्हीमुळं तपास चांगल्या पद्धतीनं होईल. पोलीस योग्य तपास करतील अशी आशा आहे. आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली. तसंच आका, चाटे, घुले सर्वच मुख्य आरोपी असल्याचं आमदार सुरेश धस म्हणाले.
खंडणी आणि हत्येतील आरोपी एकच - जरांगे पाटील : "आम्ही वेळोवेळी सांगत होतो की, जे खंडणीतील आरोपी आहेत तेच हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. हे आता सीसीटीव्हीमुळं पुन्हा एकदा सिद्ध झालं. आता या आरोपींना सोडू नका. आरोपी सुटले तर देशमुख कुटुंबीयांची हत्या होऊ शकते," अशी भीती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. "तसंच सहभागी असलेल्या मंत्र्यावरही कारवाई झाली पाहिजे," अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.
हेही वाचा -
- संतोष देशमुख हत्याकांड : खंडणीतील आरोपी विष्णू चाटेची लातूर कारागृहात रवानगी; जाणून घ्या काय आहे कारण ?
- संतोष देशमुख हत्याकांड : आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; खासदार सोनवणेंच्या पाठपुराव्यानंतर मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल
- संतोष देशमुख हत्या प्रकरण; विष्णू चाटेला 'या' तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी