नवी दिल्ली Mohammed Shami Comeback : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर क्रिकेटपासून दूर आहे. या विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी शमी सध्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) इथं आहे. यातच बीसीसीआय सचिन जय शाह यांनी शमीच्या भारतीय संघात पुनरागमनाबाबत मोठी माहिती दिली आहे.
जय शहा यांनी दिली मोठी माहिती : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उपलब्ध असल्याची पुष्टी केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाच्या तयारीबद्दल बोलताना जय शाह यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, 'आमचा संघ आधीच चांगला तयार आहे. जसप्रीत बुमराहला आम्ही काही काळ विश्रांती दिली आहे. मोहम्मद शमीकडूनही फिट राहण्याची अपेक्षा आहे. हा आता अनुभवी भारतीय संघ आहे. रोहित आणि कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू तंदुरुस्त आहेत. 'शमी तिथं (ऑस्ट्रेलियात) असेल कारण तो अनुभवी आहे आणि आम्हाला त्याची ऑस्ट्रेलियात गरज आहे.'