महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीय संघाचा ऐतिहासिक विजयी 'तिलक'; एकाच सामन्यात अनेक विक्रम इतिहासजमा - IND BEAT SA IN 3RD T20I BY 11 RUNS

भारतीय क्रिकेट संघानं तिसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

India Won Record-Breaking Match
भारतीय क्रिकेट संघ (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 14, 2024, 9:39 AM IST

सेंच्युरियन India Won Record-Breaking Match : भारतीय क्रिकेट संघानं तिसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. तिलक वर्मानं उत्कृष्ट शतक झळकावलं, तर अर्शदीप सिंगने डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 25 धावांची गरज होती. पण अर्शदीपनं संयमानं गोलंदाजी करत केवळ 13 धावा दिल्या आणि चांगली फलंदाजी करणाऱ्या मार्को यान्सनची विकेटही घेतली. या विकेटनंतर दक्षिण आफ्रिकेचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. त्यानं शेवटच्या दोन चेंडूत केवळ दोन धावा दिल्या आणि अखेर विजय भारताचा झाला.

तिलक वर्माचं T20I मध्ये पहिलं शतक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा संजू सॅमसन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी धावा काढण्याची जबाबदारी घेतली. तिलकनं 56 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह 107 धावा केल्या. अभिषेकनं 50 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा फ्लॉप झाला आणि त्याला एकच धाव करता आली. हार्दिक पांड्यानं 18 आणि रमणदीप सिंगनं 15 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच भारतीय संघ 219 धावा करण्यात यशस्वी ठरला. आफ्रिकेकडून केशव महाराजनं दोन बळी घेतले.

मार्को यान्सनचं विक्रमी अर्धशतक :हेनरिक क्लासेन व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली पण त्यांना मोठ्या डावात रूपांतरित करता आलं नाही. सलामीवीर रायन रिकेल्टननं 20 आणि रीझा हेंड्रिक्सने 21 धावा केल्या. कर्णधार एडन मॅक्रॅम चांगली सुरुवात केल्यानंतर पुन्हा एकदा पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्याला केवळ 29 धावा करता आल्या. मात्र मार्के यान्सनने 54 धावांची खेळी केली. मार्को यान्सननं भारताविरुद्धचं अर्धशतक अवघ्या 15 चेंडूत पूर्ण केलं. अशाप्रकारे, तो भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. यान्सननं ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन ग्रीनचा वर्षभर जुना विक्रम मोडला. ग्रीननं गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 19 चेंडूत अर्धशतक झळकावून मोठी कामगिरी केली होती.

भारताविरुद्ध T20I क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे फलंदाज :

  • 16 चेंडू - मार्को यान्सन (दक्षिण आफ्रिका), सेंच्युरियन 2024
  • 19 चेंडू - कॅमेरॉन ग्रीन (ऑस्ट्रेलिया), हैदराबाद 2023
  • 20 चेंडू - दाशून शनाका (श्रीलंका), पुणे 2023
  • 20 चेंडू - जॉन्सन चार्ल्स (वेस्ट इंडीज), लॉडरहिल 2016

इतकंच नाही तर या अर्धशतकामुळं मार्को यान्सन दक्षिण आफ्रिकेसाठी T20I मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा दुसरा फलंदाज बनला. यान्सननं क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्सचे रेकॉर्ड एकाच खेळीत मोडीत काढले. यापूर्वी क्विंटन डी कॉकनं 16 चेंडूत तर ट्रिस्टन स्टब्सनं 19 चेंडूत हा पराक्रम केला होता.

दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात वेगवान अर्धशतक करणारे फलंदाज :

  • 15 चेंडू - क्विंटन डी कॉक विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन 2023
  • 16 चेंडू - मार्को जॅन्सन विरुद्ध भारत, सेंच्युरियन 2024
  • 17 चेंडू - क्विंटन डी कॉक विरुद्ध इंग्लंड, डर्बन 2020
  • 19 चेंडू - ट्रिस्टन स्टब्स विरुद्ध इंग्लंड, ब्रिस्टल 2022

अर्शदीप सिंगनंही केला विक्रम : एक वेगवान गोलंदाज म्हणून, अर्शदीप सिंगनं जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार सारख्या दिग्गजांना मागे टाकत भारतासाठी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेऊन एक विक्रम केला आहे. अर्शदीपच्या नावावर आता T20I क्रिकेटमध्ये 92 विकेट्स आहेत. या सामन्यापूर्वी अर्शदीप भुवीला मागे टाकण्यापासून 2 विकेट दूर होता तर जसप्रीत बुमराहच्या 89 विकेट्सच्या बरोबरीचा होता. पण आता अर्शदीप हा T20I मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे.

T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज :

  • 96 - युझवेंद्र चहल (79 डाव)
  • 92* - अर्शदीप सिंग (59 डाव)
  • 90 - भुवनेश्वर कुमार (86 डाव)
  • 89 - जसप्रीत बुमराह (69 डाव)
  • 88* - हार्दिक पंड्या (94 डाव)

हेही वाचा :

  1. महेंद्रसिंग धोनी हाजिर हो... झारखंड उच्च न्यायालयाची 'माही'ला नोटीस, काय आहे प्रकरण?
  2. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्याचं मोठं नुकसान

ABOUT THE AUTHOR

...view details