नवी दिल्ली Jay Shah : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी रविवारी टी 20 विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्माची पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्णधार म्हणून घोषणा केली. यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की भारत ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर खेळणार का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
काय म्हणाले जय शाह : जय शाह यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं की, "या ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाचं खूप खूप अभिनंदन. मला हा विजय प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित करायचा आहे. गेल्या वर्षभरातील आमची ही तिसरी फायनल होती. जून 2023 मध्ये, आम्ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत हरलो. नोव्हेंबर 2023 मध्ये दहा विजयानंतर आम्ही मन जिंकले, पण चषक जिंकू शकलो नाही. मी राजकोटमध्ये सांगितलं होतं की जून 2024 मध्ये आम्ही मन जिंकू, चषक जिंकू आणि भारतीय ध्वजही फडकावू आणि आमच्या कर्णधारानं ध्वज फडकवला. या विजयात शेवटच्या पाच षटकांचा मोठा वाटा होता. या योगदानाबद्दल मी सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांचे आभार मानू इच्छितो. या विजयानंतर पुढील लक्ष्य आहे जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल (WTC) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी. मला पूर्ण विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही या दोन्ही स्पर्धांमध्ये चॅम्पियन बनू."