ठाणे : ३९ वर्षीय मुलानं दारूच्या नशेत मांजराच्या पिल्लाला उचलून आपटून पिल्लाची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली. ही घटना भिवंडी तालुक्यातील राहनाळ परिसरातील चर्नी पाड्यातील हनुमान मंदिराजवळ घडली. याप्रकरणी वडिलानेच मुलाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर मुलावर गुन्हा दाखल केलाय. उद्धव शिवाजी मांजरे (वय-३९) असं गुन्हा दाखल झालेल्या मद्यपीचे नाव आहे, तर शिवाजी मांजरे (वय- ६५) असं तक्रारदार बापाचं नाव आहे.
मांजराच्या पिल्लाची केली हत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिवाजी मांजरे हे भिवंडी तालुक्यातील राहनाळ परिसरातील चर्नी पाड्यात कुटुंबासह राहतात. विशेष म्हणजे, शिवाजी यांची प्राणी मित्र म्हणून ते राहत असलेल्या भागात ओळख आहे. दरम्यान, १७ जानेवारीला दीड वाजताच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील राहनाळ गावातील चर्नी पाडा येथील हनुमान मंदिराजवळ संशयित आरोपी उद्धवनं दारूच्या नशेत येवून त्या ठिकाणी बागडत असलेल्या मांजरीच्या पिल्लाला जोरात उचलून जमिनीवर आपटत मारहाण करून पिल्लाची हत्या केली.
मुलावर गुन्हा दाखल : पोलिसांनी पुढं सांगितलं, या घटनेची माहिती शिवाजी यांना मिळताच त्यांनी याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात मुलगा उद्धव विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी वडील शिवाजी मांजरे यांच्या तक्रारीवरून उद्धवच्या विरोधात कलम ३२५, प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११(१), (अ) ११ (एल) नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गुंजाळ करीत आहेत.
हेही वाचा - मनीमाऊचा तोरा हाय न्यारा; कोल्हापुरातील 'कॅट शो'मधील मांजरांच्या किंमती ऐकून तुम्हीही व्हाल थक्क