ठाणे : बदलापूरमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना एरंजाड गावात असलेल्या बसस्टॉपच्या मागील निर्जनस्थळी घडली. या प्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात पोक्सोसह अन्य कालमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याची भिवंडीतील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली आहे.
काय आहे घटना? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ वर्षीय पीडित अल्पवीयन चिमुरडी एरंजाड गावाच्या हद्दीत राहाते. तर १६ वर्षीय अल्पवयीन आरोपी हा देखील पीडित राहत असलेल्या चाळीत शेजारी राहतो. तर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरंजाड गावात मकर संक्राती दिवशी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. चिमुकलीला खेळण्याच्या बहाण्याने आरोपीनं तिला कडेवर घेतलं आणि बसस्टॉप शेजारील निर्जन ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळं भयभीत झालेली पीडिता रडू लागल्यानं अल्पवयीन आरोपीनं तिला पुन्हा घराजवळ आणून सोडलं.
बालसुधारगृहात रवानगी : १५ जानेवारी रोजी पीडित मुलगी घाबरलेली असल्यानं शाळेत जायला तयार नव्हती. तिच्या आईनं तिला विश्वासात घेऊन विचारलं, त्यावेळी तिने शेजारच्या मुलानं केलेलं कृत्य सांगितलं. यानंतर पीडित मुलीच्या आईनं बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर पोक्सो आणि ऍट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याला बाल न्यायालयापुढे हजर केलं असता बाल न्यायालयानं त्याची १४ दिवसांसाठी भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली.
हेही वाचा -