कोलंबो IND vs SL ODI : भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यात सध्या 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी कोलंबो इथं झाला. हा सामना अतिशय रोमांचकरित्या टाय झाला. यानंतर आता मालिकेतील उर्वरित दोन सामने जिंकत मालिका जिंकण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. पण श्रीलंकेनं भारताविरुद्ध शेवटची द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकून आता तिन दशकं होत आहेत. विशेष म्हणजे त्यावेळी भारतीय संघाचा सध्याचा उपकर्णधार शुभमन गिलचा जन्म देखील झाला नव्हता, तर कर्णधार रोहित आणि विराट शाळेत जात होते.
27 वर्षांपूर्वी जिंकली होती मालिका : श्रीलंकेनं भारताविरुद्ध शेवटची एकदिवसीय मालिका तब्बल 27 वर्षांपूर्वी म्हणजेच 1997 मध्ये जिंकली होती. तेव्हापासून श्रीलंकेचा संघ भारताला एकाही एकदिवसीय मालिकेत पराभूत करु शकलेला नाही. भारत आणि श्रींलकेत 1997 मध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेत श्रीलंकेनं भारताला परीभूत केलं होतं. त्या मालिकेनंतर भारत आणि श्रीलंकेत आतापर्यंत एकूण 10 एकदिवसीय मालिका खेळण्यात आल्या, मात्र श्रीलंकेचा संघ एकाही मालिकेत विजय मिळवण्यात यशस्वी ठरला नाही.