क्राइस्टचर्च Harry Brook Record : न्यूझीलंड आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात क्राइस्टचर्च इथं खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हॅरी ब्रूकनं शानदार शतक झळकावलं. हॅरी ब्रूकनं 123 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं आपलं शतक पूर्ण केलं, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 7 वं शतक आहे. त्यानं चौकारासह आपलं शतक पूर्ण केलं.
अडचणीच्या वेळी आला फलंदाजीला : पहिल्या डावात इंग्लंडची धावसंख्या 45 धावांत 3 विकेट्स अशी दयनीय असताना ब्रूक फलंदाजीसाठी मैदानात आला. सलामीवीर जॅक क्रॉली (0), जेकब बेथेल (10) आणि जो रुट (0) पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर हॅरी ब्रूक मैदानात उतरला आणि त्यानं बेन डकेटसोबत चौथ्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी केली. यानंतर बेन डकेटही निघून गेला. डकेट आपल्या अर्धशतकापासून 4 धावा दूर राहिला.
दुसरा वेगवान फलंदाज :डकेट बाद झाल्यानंतर ब्रूकनं ऑली पोपसह आघाडी घेतली. यानंतर दोघांमध्ये 151 धावांची भागीदारी झाली. ज्यामुळं इंग्लंडची धावसंख्या 200 च्या पुढे गेली. यादरम्यान ब्रूकनं कसोटीत 2000 धावा पूर्ण करण्याचा महान पराक्रम केला. हॅरी ब्रूक हा कसोटीत सर्वात कमी चेंडूंचा सामना करताना 2000 धावा पूर्ण करणारा जगातील दुसरा सर्वात वेगवान फलंदाज आहे. त्यानं 2300 चेंडूत 2000 धावांचा टप्पा गाठला. या बाबतीत इंग्लंडचा बेन डकेट पहिल्या क्रमांकावर आहे. डकेटनं 2293 चेंडूत हा मोठा टप्पा गाठला होता.