वडोदरा Hardik Pandya : घोट्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुनरागमनासाठी सज्ज आहे. हार्दिकनं नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो जोरदार गोलंदाजी करताना दिसतोय.
हार्दिकची इंस्टाग्राम पोस्ट : गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेत घोट्याला दुखापत झाल्यापासून हार्दिकनं एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. मात्र आता तो आगामी आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. आयपीएलच्या नव्या हंगामात तो मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये हार्दिक म्हणाला की, "परत आल्यानं खूप छान वाटत आहे. 17 वर्षांपूर्वी याच मैदानावर माझा प्रवास सुरू झाला होता". व्हिडिओमध्ये पांड्या गोलंदाजी करताना आणि धावण्याचा व्यायाम करताना दिसला.
विश्वचषकात दुखापत झाली : हार्दिक पांड्या गेल्या वर्षी गुजरात टायटन्समधून पुन्हा मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला, जेथे तो 2015 पासून 2021 पर्यंत खेळला होता. यानंतर त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं. नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात दुखापत झाल्यापासून तो भारतीय संघाबाहेर आहे. या महिन्याच्या सुरुवातीला तो अफगाणिस्तानविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेलाही मुकला होता.
टी 20 विश्वचषकात नेतृत्व करणार का : हार्दिक दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतही खेळला नव्हता. 2024 च्या टी 20 विश्वचषकात तो भारताचा कर्णधार मानला जात होता, मात्र दुखापतीमुळे तो या शर्यतीत मागे पडला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी 14 महिन्यांनंतर भारतीय टी-20 संघात पुनरागमन केलं. या मालिकेत दोन्ही खेळाडूंनी आपण चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलंय. अशा परिस्थितीत हे दोघेही टी-20 विश्वचषकात खेळणार हे निश्चित. रोहित विश्वचषक खेळला तर त्याचं कर्णधारपदही निश्चित आहे.
हे वाचलंत का :
- 43 वर्षीय रोहन बोपन्नानं इतिहास रचला! अशी कामगिरी करणारा जगातील सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू