मुंबई Happy Birthday Anil kumble :भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे आज 17 ऑक्टोबर रोजी 54 वर्षांचा झाला. अनिल कुंबळेचा जन्म 17 ऑक्टोबर 1970 रोजी बंगळुरुमध्ये झाला. कुंबळेनं आपल्या जादुई गोलंदाजीनं भारताला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. आज आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त अशा काही कामगिरीचा उल्लेख करणार आहोत, ज्यामुळं क्रिकेटच्या पानांवर इतिहास लिहिला गेला.
एकाच डावात घेतल्या 10 विकेट : अनिल कुंबळेनं 7 फेब्रुवारी 1999 रोजी 22 यार्डच्या खेळपट्टीवर असा पराक्रम केला की त्याची इतिहासात नोंद झाली. 25 वर्षे झाली तरी तो सामना क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. अनिल कुंबळेनं पाकिस्तानला इतकी वेदना दिली होती की, तो अजूनही पाकिस्तान क्रिकेटमध्ये जिवंत आहे. पाकिस्तानविरुद्ध एकाच डावात 10 बळी घेण्याचा महाविक्रम केला होता. दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर (आताचं अरुण जेटली स्टेडियम) पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कुंबळेनं सर्व 10 बळी घेतले. त्याच्या दमदार कामगिरीमुळं चेन्नईतील मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतानं दिल्लीत बरोबरी साधली. कुंबळेनं 74 धावा देऊन सर्व विकेट घेतल्या होत्या.
तुटलेल्या जबड्यानं उतरला मैदानात : 2002 साली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळत होता. वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात अनिल कुंबळेनं 14 षटकं टाकली आणि पहिल्या डावात केवळ 29 धावा दिल्या. यादरम्यान, तुटलेल्या जबड्यानं गोलंदाजी करताना त्यानं महान फलंदाज ब्रायन लाराची विकेट घेतली, जो 25 चेंडूत केवळ 4 धावा काढून बाद झाला. अशा प्रकारे कुंबळेनं देशभक्तीचा आदर्श घालून दिला होता.