मुंबई Cricket Umpire : भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. म्हणूनच भारतीय खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये समाविष्ट आहेत. पण जर तुम्ही क्रिकेटर बनण्यात अपयशी ठरलात आणि बेरोजगार झालात तर अंपायरिंगच्या माध्यमातून तुम्ही लाखो आणि करोडो रुपये कमावू शकता. एकप्रकारे भारतात सरकारी नोकरी मिळवण्यापेक्षा क्रिकेट अंपायर बनणं खूप सोपं आहे. यात तुमची कमाई कोणत्याही 'ए ग्रेड' सरकारी अधिकाऱ्यापेक्षा जास्त असेल.
करोडोंची होईल कमाई : भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर लोक खेळाला धर्म मानतात आणि त्याचे कार्यक्रम एखाद्या सणाप्रमाणे साजरे करतात. मात्र, या खेळाची मुळं इंग्लंडमध्ये आहेत. पण, भारत हा या खेळातील प्रमुख संघ बनला आहे. कारण भारत हा जगातील सर्वोत्तम क्रिकेट टॅलेंटचा निर्माता आहे. भारतातील क्रिकेटची लोकप्रियता आणि या खेळावरील लोकांचं प्रेम केवळ क्रिकेटपटूला प्रसिद्धच बनवत नाही तर त्याला जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू देखील बनवतं. कारण BCCI हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. पण क्रिकेटर बनण्याव्यतिरिक्त या खेळात इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याद्वारे तुम्ही भरपूर उत्पन्न मिळवू शकता. त्यापैकी एक अंपायर आहे. जर तुम्हाला क्रिकेटमध्ये रस असेल आणि तुम्ही क्रिकेटपटू म्हणून तुमचं करियर बनवण्यात यशस्वी झाला नाही तर तुम्ही अंपायर बनण्याचा विचार करु शकता आणि जर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालात तर तुम्ही लाखो आणि करोडो रुपये कमवू शकता.
ICC अंपायरचा पगार किती? : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मंजूर केलेल्या सामन्यांमध्ये काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंपायर्सना त्यांच्या देशात अंपायरिंग करणाऱ्यांपेक्षा जास्त पगार मिळतो. कारण सर्वोच्च स्तरावरील आयसीसी अंपायर प्रति वर्ष 66 लाख ते 1 कोटी 67 लाख रुपये कमवू शकतात, ज्यात सामना फी, रिटेनर फी आणि इतर भत्ते यांचा समावेश होतो. याशिवाय पंचांना प्रायोजकत्वाच्या माध्यमातून पैसेही मिळू शकतात.
किती असतं अंपायरचं वेतन : एका कसोटी सामन्यातील आयसीसी अंपायरचं वेतन 3 लाख 33 हजार रुपये आणि एकदिवसीय सामन्यात 2 लाख 26 हजार रुपये आहे. तर T20 फॉरमॅटमध्ये एका सामन्यासाठी अंपायरचा पगार सुमारे 1 लाख 25 हजार रुपये आहे. तसंच हा पगार वैयक्तिक पंचाच्या अनुभवावर आणि सामन्याचं महत्त्व यावर अवलंबून असतो. पाकिस्तानचे अलीम दार हे ICC विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात महागडे अंपायर आहेत.
BCCI अंपायरला किती पगार देते : BCCI मध्ये अंपायर्ससाठी कोणतंही निश्चित वेतन नाही. परंतु, BCCI अंपायर्सना त्यांचं वय, प्रमाणपत्र आणि अनुभव इत्यादींच्या आधारावर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागते. अहवालानुसार, A+ आणि A श्रेणीतील अंपायर्सना दररोज 40,000 रुपये आणि श्रेणी B आणि C श्रेणीतील अंपायर्सना देशांतर्गत सामन्यांसाठी प्रतिदिन 30,000 रुपये मानधन दिलं जातं. जर अंपायर म्हणून तुमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल, तर तुम्हाला ICC अंपायर्सनाच्या एलिट पॅनेलमध्ये देखील समाविष्ट केलं जाऊ शकतं. ज्यांची प्रति मॅच फी यापेक्षाही जास्त आहे.
क्रिकेटमध्ये अंपायर्सचं महत्त्व : क्रिकेट हा खेळ दोन महत्त्वाच्या व्यक्ती चालवतात ज्यांना क्रिकेटच्या भाषेत अंपायर म्हणतात. मैदानावर आणि मैदानाबाहेर सामन्यादरम्यान निर्णय घेण्याची जबाबदारी क्रिकेट अंपायर्सवर सोपवली जाते आणि सामन्यातील पंचाचा निर्णय अंतिम असतो. खेळाच्या नियमांचं पालन करुन अंपायर्स मैदानावर न्याय्य खेळाची खात्री देतात आणि खेळाचा आत्मा राखला जाईल याचीही खात्री करतात. मैदानावरील अंपायर आणि मैदानाबाहेरील तिसरे अंपायर आहेत जे संघांनी आव्हान दिलेल्या निर्णयांचं पुनरावलोकन करतात. थर्ड अंपायर ग्राउंड अंपायर्सना दिलेले निर्णय देखील ठरवतात जे मैदानात पडताळले जाऊ शकत नाहीत. अंपायर्सचा निर्णय अंतिम असला तरी काही वेळा चुका होतात. नवीन नियमांमुळं क्षेत्ररक्षण कर्णधार आणि फलंदाज पंचांच्या निर्णयांना आव्हान देऊ शकतात.