मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्पातून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तर सर्व घटकांची या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. कर मर्यादा वाढवण्यात आली आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, सामाजिक संरक्षण, उद्योग, महिला, पर्यटन, ज्येष्ठ नागरिक आदी घटकांचा या अर्थसंकल्पात सर्वसामावेश करण्यात आलाय, अशी प्रतिक्रिया आयएमसीचे महासंचालक अजित मंगरूळकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रही भारतातच येतो : आगामी काळात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. हे डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारनं बिहारसाठी मोठ-मोठ्या घोषणा केल्याचं बोललं जातंय. तसंच मुंबई आणि महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून काहीच मिळालं नाही, अशीही टीका केली जात आहे. यासंदर्भात अजित मंगरूळकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, "महाराष्ट्र हा देशातच येतो. बिहार असो किंवा महाराष्ट्र दोन्ही राज्याची प्रगती झाली की देशाची प्रगती होते. त्यामुळं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा केली, असं मला वाटत नाही. तर दुसरीकडं कर मर्यादा वाढवल्यामुळं मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळालाय. यामुळं आपल्या जीडीपीतदेखील वाढ होणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसंच देशात अंतर्गत नवीन 50 पर्यटन क्षेत्र निर्माण होणार आहेत. या पर्यटनामुळं रोजगार निर्मिती होईल आणि अर्थचक्र वाढेल. अर्थव्यवस्थेला हे पर्यटन क्षेत्र हातभार लावेल," असा विश्वास मंगरूळकर यांनी व्यक्त केलाय.
अर्थसंकल्पाला 10 पैकी 9 मार्क : पुढं ते म्हणाले, "या अर्थसंकल्पातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये सामाजिक सुरक्षा, शिक्षण, उद्योग, ऑटोमोबाईल, पर्यटन, महिला, तरुण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींसाठी मोठ्या घोषणा आणि तरतूद करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पात डिस्प्ले, एलईडी टीव्ही तसंच त्यांचे पार्ट्स यांचे दर कमी होणार असल्यामुळं सामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे. तसंच ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये ईव्ही बॅटरींच्या किंमती कमी झाल्यामुळं सामान्य लोकांना आणि मध्यमवर्गीय लोकांचे गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल. हा अर्थसंकल्प अत्यंत चांगला आणि सामान्य लोकांना दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पाला मी दहापैकी दहा मार्क दिले असते, पण मी नऊ मार्क देतो," असंही अजित मंगरूळकर म्हणाले.
हेही वाचा -