हैदराबाद- हिंदू धर्मात वसंत पंचमीचं विशेष ( basant panchami 2025) असं महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, देवी सरस्वतीचा अवतार हा वसंत पंचमीच्या दिवशी झाला. त्यामुळे ज्ञानाची देवता म्हणून मान्यता असलेल्या देवी सरस्वतीची वसंत पंचमीला पूजा करण्याची परंपरा आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, वसंत पंचमी दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीला साजरी केली जाते. त्यानुसार देशात आज वसंत पंचमी साजरी केली जाते. वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा केल्यानं बुद्धिमत्ता, ज्ञान मिळून प्रगती मिळते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे देवी सरस्वतीची शाळा आणि मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते. वसंत पंचमीला श्री पंचमी, वसंत पंचमी, सरस्वती पंचमी आणि ऋषी पंचमी असंही म्हटलं जातं.
- लग्नासाठी शुभ असते वसंत पंचमी: वसंत पंचमीच्या दिवशी लग्न, नामकरण समारंभ, गृहप्रवेश, मुंडन आणि सोने-वाहन अशा महागड्या वस्तुंची खरेदी केली जाते. वसंत पंचमीला लग्न करणाऱ्या वधू-वराला देव-देवतांचे विशेष आशीर्वाद मिळतात, असे मानलं जाते. त्यामुळे लग्नासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो.
वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त कधी ( saraswati puja shubh muhurat) : वसंत पंचमीची पंचमी तिथी आज सकाळी ९:१४ वाजता सुरू होईल. तर ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६:५२ वाजता तिथी संपेल. ३ फेब्रुवारी रोजी सूर्योदयासह पंचमी तिथी संपणार आहे. देशाच्या काही भागात वसंत पंचमी २ फेब्रुवारी रोजी तर बिहारसह अनेक राज्यात ३ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी साजरी केली जाईल. या वर्षी वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:०९ ते दुपारी १२:३५ पर्यंत शिवयोगाला असणार आहे. त्यामुळे आज सरस्वती देवीची पूजा करण्यासाठी ५ तास २६ मिनिटे उपलब्ध होणार आहेत.
अशी करा सरस्वतीची पूजा- वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे. देवी सरस्वतीला आज पिवळी फुले अर्पण करणं शुभ मानलं जातं. देवी लवकर प्रसन्न होण्याकरिता पिवळे कपडेदेखील घालतात. सरस्वती देवीच्या पूजेमध्ये पेन, पुस्तक यांचाही समावेश करावा. तुम्ही सरस्वती देवीला पिवळ्या रंगाचे बेसनाचे लाडू किंवा बुंदीचे लाडूदेखील अर्पण करू शकता.
- १४४ वर्षांनंतर शुभ योग- ज्योतिषाचार्य शैलेश शास्त्री म्हणाले, "१४४ वर्षांनंतर या वेळी वसंत पंचमीला ग्रहांचा अद्भुत योग आहे. या दिवशी काही विशेष उपाय केले तर शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळू शकते. महाकुंभमधील शेवटचे अमृत स्नान २०२५ वसंत पंचमीला होत आहे. त्यामुळे हा दिवस अधिक पवित्र आणि फलदायी मानला जात आहे."
वसंत पंचमीची काय आहे पौराणिक कथा- वसंत ऋतूची सुरुवात वसंत पंचमीच्या दिवसापासून होते. या दिवशी विविध राज्यांमध्ये देवी सरस्वतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की वसंत पंचमीच्या दिवशी ब्रम्हदेवाच्या आशीर्वादानं देवी सरस्वतीचा अवतार झाला होता. विश्वाच्या निर्मितीनंतर एकही शब्द नव्हता. कोणीही बोलत नव्हते. तेव्हा ब्रम्हदेव सरस्वतीला म्हणाले, तुमच्या हातात असलेल्या या वीणेतून आवाज काढा. तेव्हा सरस्वतीनं वीणेला स्पर्श केल्यानंतर आवाज आला. त्यामधून सूर आणि शब्द अस्तित्वात आले.
हेही वाचा-
(Disclaimer- धार्मिक मान्यतेनुसार ही माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत कोणताही दावा करत नाही)