नवी दिल्ली Joe Root Record : इंग्लंड क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला. इंग्लंडच्या या विजयात जो रुटचं महत्त्वाचं योगदान होतं. श्रीलंकेनं आपल्या दुसऱ्या डावात उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी करत सामना रोमांचक बनवला होता. मात्र रुटनं आपल्या 62 धावांच्या अर्धशतकानं इंग्लंडसाठी सामना सोपा केला. या अर्धशतकाबरोबरच त्यानं काही मोठे पराक्रमही केले. कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतकं झळकावण्याच्या बाबतीत रुटनं भारताचा 'द वॉल' राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डरला मागं टाकलं. त्याचवेळी तो सचिनच्या विक्रमाच्या जवळ आला आहे. या खेळीमुळं तो महान फलंदाजांच्या यादीत आला आहे.
रुट टॉप-3 मध्ये समाविष्ट : जो रुटनं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या डावात कारकिर्दीतील 64 वं अर्धशतक झळकावलं. यासह, तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानं राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डरला मागं टाकलं आहे. या दोन्ही फलंदाजांनी कसोटीत 63-63 अर्धशतकं केली होती. आता रुटच्या पुढे फक्त वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल आणि भारताचा सचिन तेंडुलकर उरला आहे. दोन अर्धशतकांनंतर तो चंद्रपॉलच्या बरोबरीचा असेल. तर आणखी 4 अर्धशतकं ठोकून तो सचिनची बरोबरी करु शकेल. अर्थात, क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिनचा हा विक्रम लवकरच जो रुट मोडण्याची शक्यता आहे.