नवी दिल्ली Bajrang Punia Criticised : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये चमकदार कामगिरी करुनही अंतिम फेरीतून अपात्र ठरलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिचं आज देशात परतल्यावर जंगी स्वागत करण्यात आलं. तिचे सहकारी भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक तिचं स्वागत करण्यासाठी दिल्ली विमानतळावर पोहोचले. विनेशनं दोघांना मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. या घटनेदरम्यान बजरंग पुनिया अडचणीत आला जेव्हा तो 'तिरंगा' असलेल्या पोस्टरवर विनेशचं स्वागत करताना दिसला.
बजरंग पुनिया तिरंग्याच्या पोस्टरवर उभा : विनेश फोगटच्या भव्य स्वागतादरम्यान, बजरंग जेव्हा 'तिरंगा' असलेल्या पोस्टरवर उभा होता. तेव्हा त्याला अडचणीचा सामना करावा लागला. एका व्हिडिओमध्ये, बजरंग पुनिया एका कारच्या बोनेटवर उभा होता, ज्यावर 'तिरंगा' चिकटवलं होतं. पुनिया या वेळी गर्दी आणि मीडिया हाताळत असताना अनवधानानं त्याचा पाय 'तिरंगा'च्या पोस्टरवर पडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यूजर्स यावरुन कुस्तीपटू बजरंगवर टीका करत आहेत.
लोकांनी केली बजरंगवर टीका :बजरंगनं 'तिरंग्या'चा अपमान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भारतीय कुस्तीपटूवर तिरंग्याच्या पोस्टरवर उभं राहून भारतीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप केला. दाट गर्दीतून गाडी विमानतळाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना तो गर्दी आणि मीडिया हाताळण्यात व्यस्त असल्यानं अनवधानानं हे घडलं असावं. तथापि, नेटिझन्स त्यावर खूप टीका करत आहेत कारण त्यांना वाटते की ते भारतीय राष्ट्रध्वजाचं अपमान आहे.
सोशल मीडिया वापरकर्त्यांना फटकारलं : बजरंग पुनियाच्या व्हायरल व्हिडिओवर नेटिझन्स सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका सोशल मीडिया यूजरनं लिहिले, 'तिरंग्याच्या स्टिकरवर उभा असलेला बजरंग पुनिया. दीपेंद्रसिंग हुड्डाही त्याला थांबवत नाहीत. तर दुसऱ्यानं लिहिलं की, 'बजरंग पुनिया तिरंग्यावर पाय ठेवून उभा आहे, देशाची शान आहे. आता या पैलवानाला काय म्हणावं? त्याचवेळी आणखी एका सोशल मीडिया यूजरनं लिहिलं की, 'बजरंग पुनियाचं सर्वात लज्जास्पद कृत्य! बजरंग पुनियाला लाज वाटली पाहिजे, तो पत्रकारांचा माईक हातात धरुन आपल्या राष्ट्राभिमानाच्या तिरंग्यावर उभा आहे. बजरंग पुनिया यांना काँग्रेसचं तिकीट कसंही मिळेल हे आम्हाला ठाऊक आहे, इटालियन कुटुंबाला प्रभावित करण्यासाठी असं करण्याची गरज नाही.
हेही वाचा :
- "देव तुम्हाला शुद्ध बुद्धी देवो..."; भारतात परतल्यावर विनेश फोगटवर मेहुणे भडकले - Vinesh Phogat criticize
- विनेश फोगट भारतात परतली, स्वागतासाठी मोठी गर्दी; बजरंग-साक्षी आणि कुटुंबीयांना पाहून अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ - Vinesh Phogat Paris Olympics