मुंबई Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे, हे असं नाव ज्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे बंद झाले आहेत. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळं त्याला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये संधी मिळाली आणि त्यानं चांगली कामगिरी केली. मात्र आता पुन्हा एकदा पुनरागमन करणं कठीण वाटू लागलं, त्यामुळं रहाणेनं काही वर्षात त्याचा फॉर्म पूर्णपणे बदलला आहे. वाढत्या वयाबरोबर रहाणे गोलंदाजांमध्ये वेगळीच दहशत निर्माण करत आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय स्पर्धेत लीसेस्टरशायर आणि हॅम्पशायर यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यानं स्फोटक खेळी खेळली आणि संघाला विजयी करत उपांत्य फेरीत नेलं.
संघ पोहोचला उपांत्य फेरीत : लीसेस्टरशायरकडून अजिंक्य रहाणेशिवाय पीटर हँड्सकॉम्ब आणि लियाम ट्रेव्हस्किस यांनीही लीसेस्टरशायरकडून अर्धशतकं झळकावली. यांच्या खेळीमुळं संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात लेस्टरशायरनं 3 विकेट्स राखून रोमांचक विजय नोंदवला. या विजयासह गतविजेता लीसेस्टरशायर संघ एकदिवसीय चषक स्पर्धेतील विजेतेपदापासून केवळ 2 पावलं दूर आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेनं 86 चेंडूंत 2 चौकार आणि 3 उत्कृष्ट षटकारांच्या मदतीनं 70 धावांची उत्कृष्ट खेळी केली.