बुलावायो 600 Plus Total in Test Matches :अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु असून त्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. हे दोन्ही सामने दोन्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023-25 सायकलचा भाग नाहीत. या सामन्यात अफगाणिस्तानसाठी फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आणि तीन खेळाडूंनी शतकं झळकावली, त्यापैकी रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदी यांनी तर द्विशतकं झळकावली.
अफगाण संघानं उभारला 699 धावांचा डोंगर : अफगाणिस्ताननं या सामन्यात केवळ एक डाव खेळला आणि त्यात तब्बल 699 धावा केल्या. रहमत शाह (234 धावा), हशमतुल्ला शाहिदी (246 धावा) आणि अफसर झाझाई (113 धावा) यांनी संघासाठी उत्कृष्ट खेळी खेळली. या खेळाडूंमुळंच अफगाणिस्तान संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. अफगाणिस्ताननं आतापर्यंत फक्त 10 कसोटी सामने खेळले आहेत आणि इतके कमी सामने खेळूनही संघानं प्रथमच 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
पाकिस्तानी संघाचा विक्रम मोडला : अफगाणिस्ताननं पाकिस्तानचा विक्रम उद्ध्वस्त केला आहे. अफगाणिस्तान संघ सर्वात कमी कसोटी सामने खेळून प्रथमच 600 हून अधिक धावा करणारा संघ बनला आहे. त्यांनी फक्त 10 कसोटी खेळल्या आहेत. यापूर्वीचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तानी संघानं 1958 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 8 विकेट गमावत 657 धावा केल्या होत्या. हा पाकिस्तानचा कसोटी क्रिकेटमधील 19 वा सामना होता.