मुंबई MNS BJP Alliance : दादरच्या शिवाजी पार्कमध्ये इंडिया आघाडीच्या सभेनंतर पुन्हा एकदा मनसे भाजपा युतीची चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी आज (19 मार्च) दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. त्यामुळं आता मनसे आणि भाजपाची युती झाल्यास महाराष्ट्रात नेमकं काय चित्र असेल? मनसेवर काय परिणाम होईल? भाजपाला काय फायदा होईल? या आशयाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याचाच आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट.
स्थापना आणि मनसेची वाटचाल : बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आपल्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. 2006 ते 2009 या तीन वर्षात राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. विविध ठिकाणी सभा घेतल्या या सभांमध्ये मराठी माणूस म्हणजे कोण? आणि 'संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र निर्माण करायचा' ही दोन वाक्यं प्रचंड चर्चेत राहिली. 2009 साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकांमध्ये राज ठाकरे या नावाचं प्रचंड वलय होतं. राज ठाकरे नावाच्या लाटेत त्यावेळी स्वबळावर मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून आले. त्यानंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये मनसेने स्वबळाचाच नारा देत राज ठाकरे या नावावर निवडणुका लढवल्या. मात्र, 2009 प्रमाणे मनसेला या निवडणुकांमध्ये यश आलं नाही.
संघटनेत फूट : 2009 साली निवडून आलेले 13 आमदार काय करतात? असा प्रश्न उपस्थित केला जातो. या तेरा आमदारांमधील राम कदम आणि प्रवीण दरेकर यांनी भाजपाचे कमळ हातात घेतले आणि पुढं ते भाजपामध्ये एक मोठे नेते म्हणून उदयास आले. आज मनसेच्या या 13 आमदारांपैकी फक्त शिशिर शिंदे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे तीनच आमदार राज ठाकरेंसोबत आहेत. तळागाळातील कार्यकर्ते आणि मनसेची कोअर कमिटी यांच्यात देखील अनेकदा मतभेद झाल्याचं समोर आलं आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे पुण्यातील वसंत मोरे प्रकरण. मनसेचा खळ्ळ-खट्याकचा चेहरा, राज ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी आणि मनसेला मिळणारी मतं यात प्रचंड तफावत दिसून येते. याला कारणीभूत मनसेची अंतर्गत गटबाजी आणि मनसेची दिवसेंदिवस कमी झालेला जनतेतील विश्वासार्हता असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
भाजपा युती का करतोय : 2009 नंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये मनसेचा आलेख सातत्यानं ढासाळतानाच दिसतो. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू देत किंवा विधानसभेच्या निवडणुका मनसेला जनतेची पसंती फार नसल्याचं दिसून येत. अशावेळी प्रश्न उभा राहतो ज्या पक्षाचा एकच आमदार आहे त्या पक्षाला सोबत घेऊन भाजपाचा फायदा काय? यासंदर्भात बोलताना राजकीय विश्लेषण आनंद गायकवाड सांगतात की, याचं पहिलं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती तुटल्यानं भाजपाला सध्या ठाकरे नावाची गरज आहे. महाराष्ट्रात ठाकरे नावाला मोठे वलय आहे आणि या नावाला मानणारा मोठा वर्ग देखील महाराष्ट्रात आहे. मनसे बरोबर भाजपानं युती केल्यास भाजपाला एक ठाकरे नावाचा ब्रँड मिळेल. याचं दुसर कारण म्हणजे राज ठाकरे यांचं वक्तृत्व कौशल्य, त्यांच्या सभांना होणारी गर्दी आणि राज ठाकरे या नावाकडं आकर्षित होणारा तरुण वर्ग.