नागपूर : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर पराभवाची जबाबदारी कुणी घ्यावी? हा प्रश्न काँग्रेसमध्ये निर्माण झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगलीय. मात्र, नाना पटोले यांच्या निकटवर्तीयांनी या संदर्भात नकार दिला आहे. दुसरीकडे, नाना पटोले यांच्या जागी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा आहे. या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "नाना पटोले राजीनामा देणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत. मला जी जवाबदारी दिली, ती यशस्वीपणं सांभाळून दाखवली. पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा पण...: भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावर विजय वडेट्टीवार यांना विचारलं असता वडेट्टीवारांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत काही प्रश्न उपस्थित केले. "महाराष्ट्रात नवं सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतं? वाढलेली महागाई रोखण्यासाठी काय करतं? यासह राज्यात अनेक प्रश्न आहेत. आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका पार पाडू. एक नक्की आहे की, हे सरकार जनतेनं निवडून दिलं आहे," असं वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी कुणाची लाट होती? : "2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असताना, आम्ही 42 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये पुलवामासारख्या घटना घडल्या. त्यावेळी काँग्रेस हे दोन आकड्यापर्यंत जाणार नाही, असं बोललं जात होतं. तेव्हा आम्ही 44 जागा जिंकल्या, आता आम्ही 16 जागा जिंकल्या. आमच्या जागा इतक्या कमी झाल्या त्यामुळं जनता देखील संशयाच्या नजरेनं बघत आहे. 'लाडकी बहीण याजने'मुळे 5 टक्के मतं फिरली असतील. पण अजून काय घडलं यावर अभ्यास आणि विचार करावा लागेल," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
निकाल धक्कादायक : "शेवटच्या टप्प्यात महायुतीत वाद होता. उलट महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता. एकत्र काम करत होतो. दोष देण्यापेक्षा आत्मनिरीक्षण करणार. आम्ही सर्वच सामूहिक लढलो, हा निकाल धक्कादायक आणि न पचण्यासारखा आहे. महायुतीनं विजयाचे कितीही दावे केले, तरी हा विजय यांचा नसून तो ईव्हीएमचा आहे. ईव्हीएमला हार घालून विजय साजरा करावा," असं वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा