मुंबई- राज्याच्या 14 व्या विधानसभेची आज मुदत संपणार आहे. बहुमतात निवडून आलेल्या महायुतीला सरकार स्थापन करावं लागणार आहे. राज्यात राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे.
शिवसेनेचे नेते दीपक केसरकर म्हणाले, " मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. नवीन सरकार लवकरच स्थापन केले जाईल. यासंदर्भात वरिष्ठ नेते एकत्र बसतील. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. भाजपच्या गटनेते पदाची बैठक उद्या होणार आहे. प्रत्येक पक्षाला वाटते, आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा. पण, याबाबत दिल्लीत निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ नेत्यांना अगोदरच सांगितले आहे, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल."
महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 25, 2024
Live updates
- मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पदाचा राजीनामा सोपविला आहे.
- नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू म्हणून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणार आहे
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर पोहोचले आहेत.
- थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत.
- शिवसेनेचे खासदार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट
- सात विद्यमान खासदार आणि चार माजी खासदार यांनी पंतप्रधानांची मागितली वेळ
- खासदार पंतप्रधानांची कोणत्या कारणास्तव भेट? यावरून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क
राज्यातील सरकार स्थापनेबाबत दिल्ली दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांबरोबर बैठक झाली की नाही? याबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आलेली आहे.
भाजपाच्या विधिमंडळ नेत्याची निवड प्रलंबित- महायुतील भाजपाला 132 जागा मिळाल्यानंतर महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपददेखील मिळू शकत नाही, अशी स्थिती आहे. दणदणीत विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना मिळावं, अशी भाजपा नेत्यांसह कार्यकर्त्यांमधून मागणी होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी त्यांच्या सागर बंगल्यावर नवनिर्वाचित आमदारांची भेट घेतली. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपानं विधिमंडळ पक्षाचे गटनेते, मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांच्या निवडीसाठी नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलाविलेली नाही. मात्र, शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे विधिमंडळातील गटनेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महायुतीमधील घटकपक्षांनी निवड केली.
भाजपा नेत्यांसह संघाकडून देवेंद्र फडणवीस यांना पसंती- भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितले की," फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, अशी केवळ भाजपाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीदेखील इच्छा आहे. वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री आहेत. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर, फडणवीस यांनी पक्षादेशानुसार उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. भाजपानं 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत 122 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपानं 132 जागा जिंकल्या आहेत. हे फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे शक्य झालं. केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत लवकरच हिरवा कंदील दिला जाईल अशी अपेक्षा आहे."
कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचं मुख्यमंत्र्यांच आवाहन-दुसरीकडं महायुतीच्या निवडणुकीतील यशाचं श्रेय देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी म्हणून पुन्हा संधी द्यावी, अशी शिवसेनेतून जोरदार मागणी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री एक्स मीडियावर पोस्ट करत गर्दी न करण्याचं आवाहन केलं. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे. यापुढेही भक्कमच राहील."
राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळणार नाही- उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असा युक्तिवाद राष्ट्रवादीचे आमदार करत आहेत. भाजपा आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन वर्षे आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी मुख्यमंत्रिपद एक वर्षासाठी असेल. संबंधित पक्षांच्या आमदारांच्या संख्येवर हा फॉर्म्युला असेल. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी असा कोणताही फॉर्म्युला नसेल, असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-