छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Vijay Wadettiwar On Dhananjay Munde : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटात सोडून कृषी मंत्री परदेशात जातात कसे, तुम्ही XX मारायला मंत्री झालाय का? अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली. "बियाणी मिळत नाहीत, शेतकरी एवढ्या उन्हात रांगा लावतोय. घामानं हैराण झालाय, शेतकऱ्यावर इतकी संकटं असताना हे बाहेर जातात कसे असा प्रश्न मला पडतो. तुमच्या विभागीय बैठकीला मंत्री उपस्थित राहणार नाही. मग काय तुम्ही XX मारायला मंत्री झाला का? फक्त टक्केवारी घेण्यात तुम्ही व्यग्र आहात. तुम्हाला जेवढं लुटायचं तेवढं लुटा", असं वडेट्टीवार म्हणालेत. त्यामुळं वडेट्टीवारांच्या या टीकेला आता धनंजय मुंडे काय उत्तर देतील? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून चूक पण... : पुढं बोलत असताना वडेट्टीवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणारा माणूस म्हणजे जितेंद्र आव्हाड आहे. चुकीला माफी नाही म्हणत त्यांनी स्वत:ची चूक सर्वांसमोर मान्य देखील केलीय. मात्र, आता मनुस्मृती मानणारा भाजपा त्याचं भांडवल करतंय. बाबासाहेबांचा सन्मान यांच्या मनात आहे का?, असा सवाल त्यांनी केला. तसंच पोटात एक आणि ओठात एक अशी भाजपाची भूमिका असल्याचंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
पुण्यातील घटनेवर बोलताना : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणासंदर्भात बोलत असताना ते म्हणाले की, "घटना घडल्यानंतर आठ तास गुन्हा दाखल होत नाही. रक्ताचे नमुने बदलले जातात, हे सगळं आपण बघितलं. तसंच पोलीस आणि आरोग्य विभाग कुठल्यातरी राजकीय दबावाला बळी पडतोय. मग या प्रकरणातील सत्यता काय? हा खरा प्रश्न आहे. डॉ. अजय तावरेला निलंबित करा म्हणून तत्कालीन वैद्यकीय संचालक म्हैसेकर यांनी प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यानंतर त्यांचा बदलीचा प्रस्ताव मंत्रालयात गेला. गेल्या दहा वर्षांपासून अजय तावरेची बदली झालेली नाही. याचाच अर्थ त्याला कुणाचा तरी राजाश्रय आहे असा होतो.
मराठवाड्यात भीषण दुष्काळ :"मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पंचनामे होतात मात्र शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. मराठवाड्यात शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम झालंय. संभाजीनगरमध्ये 1561 गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात झाल्यात. 267 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलय. अनेक भागात 15-15 दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही. उद्या नाना पटोले हे देखील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. जालना जिल्ह्यातील जवखेडा गावातमधील कुंभार समाजाच्या कुटुंबासाठी मी मुद्दाम आलोय. बँकेचा कर्मचारी शेतकऱ्याला कर्ज मिळवण्यासाठी लाच मागतो, हे दुर्दैव आहे", असं वडेट्टीवार म्हणाले.