प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ मोकळे मुंबई Maha Vikas Aghadi Meeting : भाजपाला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी देशात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिलाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी जागा वाटपावर एकमत होत नाही. मुंबईत महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या संदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या बैठकीचं निमंत्रण नसल्याचं 'वंचित'नं स्पष्ट केलं आहे. यावेळी वंचितचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला.
कोण कोण राहणार उपस्थित: मुंबई शहरातील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारनंतर ही बैठक होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत.
संजय राऊत यांनी गैरफायदा घेऊ नये : बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलं असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी आपल्याला कोणतेही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाच्या नेत्यांची सही असलेलं निमंत्रण पत्र प्राप्त झालं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच आमची युती शिवसेनासोबत आहे. मात्र त्याचा गैरफायदा खासदार संजय राऊत यांनी घेऊ नये, असं म्हणत आम्ही बैठकीला जाणार नसल्याची भूमिका मोकळ यांनी स्पष्ट केलीय.
जागा वाटपाच्या फॉर्मुला निश्चित केला जाणार : महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा होणार आहे. आजपर्यंत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये 15 जागांवर एक मत झालं नसल्याचं समोर आलं आहे. आज होणाऱ्या बैठकीत या 15 जागांवर मंथन केलं जाणार असून जागा वाटपाच्या फॉर्मुला निश्चित केला जाणार असल्याची शक्यता सूत्रांकडून दिली आहे. ठाकरे शिवसेना 23 जागांवर ठाम असल्याचं समजत असून काँग्रेस पक्षाला जास्त जागा हव्या आहेत. राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांना 3 जागा देण्याबाबतचे चर्चा सुरू असून ठाकरे गटातील दोन जागा प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक जागा राजू शेट्टी यांना देण्याबाबत विचार सुरू आहे.
जागा वाटपात नवा भूमिका : इंडिया आघाडीसोबत आगामी लोकसभा निवडणुका न लढता स्वबळावर लढण्याबाबत ममता बॅनर्जी आणि भगवंत मान यांनी घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळं, आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस बॅक फुटवर येऊन जागा वाटपात नवी भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -
- रामाचा मुद्दा निवडणुकीत वापरणार म्हणून तुमच्या का पोटात दुखतंय; संजय शिरसाटांचा टोला
- देवेंद्र फडणवीस शतमूर्ख असतील, पण मी तसं म्हणणार नाही - संजय राऊतांची टीका
- "आमचा शिवसैनिक बाबरीच्या घुमटावर होता, तुम्ही नागपूर रेल्वे स्टेशनला फिरायला गेले होते का?" राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर