यवतमाळ Uddhav Thackrey Invites Nitin Gadkari : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटातील पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते हे सातत्यानं गट सोडत असताना त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीत येण्याचं आवाहन केलं. "आपला अपमान होत असेल तर भाजपा सोडा," असं म्हणत त्यांनी गडकरी यांना ऑफर दिलीय. दोन दिवसांपूर्वी ठाकरे यांनी गडकरींना अशीच ऑफर दिली होती. त्यावर गडकरींनी अपरिपक्व विधान म्हणत ठाकरेंनी काळजी करण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे.
ठाकरेंचा गडकरींना पुन्हा ऑफर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथं सभेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले की, "काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह यांच्यावर भाजपानं भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, या यादीतून गडकरींचं नाव गायब होते. मी दोन दिवसांपूर्वी गडकरींना सांगितलं होतं आणि पुन्हा सांगत आहे. तुमचा अपमान होत असेल तर तुम्ही भाजपा सोडून महाविकास आघाडीत या. महाविकास आघाडी तुमचा विजय निश्चित करेल याची मला खात्री आहे. तसंच आमचं सरकार सत्तेत आल्यास महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी तुमच्याकडं सोपवू. देशात आमचं सरकार येणार आहे. गडकरीजी का झुकता त्यांच्यासमोर, दाखवा त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय आहे," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना पुनश्च आपल्या पक्षात येण्याचं जाहीर आमंत्रण दिलंय.