मुंबई Uddhav Thackeray News :राज्यात लोकसभा निवडणुकांच्या तीन टप्प्यांच्या प्रचारानंतर आता शेवटच्या दोन टप्प्यातील प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षानं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून या स्टार प्रचारकांच्या सभा आपापल्या मतदारसंघात व्हाव्यात यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसच्या वतीनं प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या केंद्रीय नेत्यांसह राज्यातील नाना पटोले, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या यादीत शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जयंत पाटील या प्रमुख नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांनी सभांची धुरा सांभाळली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती सभा : महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील सभांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं बघायला मिळतंय. तसंच गेल्या काही महिन्यात मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या विरोधात घेतलेल्या ठाम भूमिकेचं स्वागत केलं जातंय. त्यामुळं आपल्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा व्हावी, यासाठी केवळ ठाकरे गटाचेच नव्हे तर महाविकास आघाडीतील अन्य पक्षांचे उमेदवार देखील आग्रही आहेत. त्यामुळंच अमरावती, धुळे, सोलापूर, पुणे इथल्या उद्धव ठाकरे यांच्या सभा नियोजित नसतानाही त्यांना काँग्रेसच्या उमेदवारांच्या आग्रहाखातर सभा घ्याव्या लागल्या, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी सांगितलं.