मुंबई Supriya Sule On Election Commission Decision : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीप्रकरणी निवडणूक आयोगानं आज (6 फेब्रुवारी) मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार गटच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं आज निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. या निकालानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे अदृश्य शक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र आणि मराठी लोकांविरुद्धचे कट असल्याचं म्हटलं आहे. तसंच या निर्णयाचे मला अजिबात आश्चर्य वाटत नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.
शरद पवारांविरुद्ध ‘कट’ रचला जातोय :पुढं त्या म्हणाल्या की, "दोन्ही पक्ष (राष्ट्रवादी आणि शिवसेना) महाराष्ट्रात जन्माला आले. त्यांचे नेतृत्व मराठी माणसानं केले. अदृष्य शक्ती मराठी माणसाचं आणि राज्याचं नुकसान करणारे निर्णय कशी घेते याचं हे आणखी एक उदाहरण आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाविरुद्ध रचला गेलेला ‘कट’ आता शरद पवारांविरुद्ध रचला जातोय. पवार साहेबांनी कोणताही वारसा किंवा पार्श्वभूमी नसताना आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. निवडणूक आयोगाचा हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय आहे."
जयंत पाटील यांची प्रतिक्रिया :या प्रकरणी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ते निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. तसंच "राष्ट्रवादीची स्थापना शरद पवार यांनी केली होती. त्यांनी तळागाळातून त्याचा विकास केला. अनेक नेत्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत वाढण्यास मदत केली", असंही ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले :शरद पवारांचे निष्ठावंत आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, "राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्हं कोणाला मिळणार हे आधीच ठरलेलं होतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्ताराच्या प्रयत्नांचे फळ ज्यांनी भोगले ते आता या दिग्गजाची राजकीय गळचेपी करत आहेत. याचं दु:ख होतंय." पुढं ते म्हणाले की, "शरद पवार हेच आमचा पक्ष आहेत. तेच आमचे प्रतीक आहेत. या राज्यातील जनता त्यांना ओळखते. राज्यात अनेक लोक आजही पवारांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. तसंच शरद पवार फिनिक्स पक्षी म्हणून उदयास येतील", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -
- राष्ट्रवादी अजित पवारांचीच! निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय आहेत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया?
- शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष गमावला, सुप्रिया सुळेंनी 'ही' दिली पहिली प्रतिक्रिया
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं राजकीय वादंग; राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आमनेसामने