बुलढाणा MLA Cake Cutting Controversy : शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड याचा वाढदिवस गुरुवारी (15 ऑगस्ट) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीनं स्टेजवर वाढदिवसाचा केक कापला. त्यानंतर त्यांनी तलवारीनंच तो केक पत्नीसह मुलाला भरवला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याता यावा, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी संजय गायकवाड यांच्यासह इतर तिघांवर मुंबई पोलीस कायदा 135 अन्वये कलम 37 (1) (3) नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिलीय.
संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया :या संपूर्ण प्रकरणावर संजय गायकवाड यांनी भाष्य करत आपल्या कृतीचं स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले "तलवारीनं केक कापणं हा गुन्हा होऊ शकत नाही. तलवारीनं केक कापण्याचा हेतू कोणाचंही नुकसान करण्याचा नाही. यावर गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे. नेत्यांना तलवारी देणं हे शौर्याचं प्रतीक मानलं जातं. पोलीस परेडच्या वेळीही पोलीस तलवार दाखवतात. मग ते लोकांना धमकावतात का? ऑलिम्पिकमधील तलवारबाजीचा खेळही बंद होणार का? आमच्या पूर्वजांपासून आम्ही तलवार चालवतो, म्हणून आम्ही तलवारीचा वापर करू. तसंच गुन्हा दाखल झाला तर आम्ही हायकोर्टात गुन्हा क्रॅश सुद्धा करू शकतो," असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी अशा प्रकारे तलवार दाखवणं हा गुन्हा नसल्याचा अजब दावा केलाय.