महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अर्धा सातारा जिल्हा मंत्रिमंडळात, राजघराण्याला तिसऱ्यांदा 'लाल दिवा' - MAHARASHTRA CABINET EXPANSION

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. त्यात सातारा, वाई, पाटणसह माण तालुक्याला मंत्रिपद मिळणार असल्याचं आता निश्चित झालंय.

Satara News
साताऱ्याच्या राजघराण्याला तिसऱ्यांदा मंत्रिपद (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2024, 3:49 PM IST

सातारा: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्यातील आठपैकी तब्बल चार मतदारसंघातील आमदार मंत्रिमंडळात दिसणार आहेत. भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले (सातारा), जयकुमार गोरे (माण), राष्ट्रवादीचे (अजित पवार) मकरंद पाटील (वाई), शिवसेनेचे शंभूराज देसाई (पाटण) यांना शपथविधीसाठी बोलावणं आलंय. साताऱ्याच्या राजघराण्याला तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळत असून पालकमंत्री पदाची लॉटरीही लागणार आहे.



राजघराण्यात तिसऱ्यांदा 'लाल दिवा' :साताऱ्याच्या राजघराण्यातून सर्वात पहिल्यांदा दिवंगत अभयसिंहराजे भोसले हे राजकारणात सक्रिय होते. त्यांनी विधिमंडळात साताऱ्याचं बराच काळ नेतृत्व केलं. कॅबिनेट मंत्री आणि साताऱ्याचं पालकमंत्रिपदही त्यांनी सांभाळलं होतं. त्यानंतर सेना-भाजपा युती सरकारच्या काळात उदयनराजे भोसले महसूल राज्यमंत्री होते. आता शिवेंद्रराजे भोसले यांच्या रूपानं राजघराण्यातील तिसरी व्यक्ती मंत्री होत आहे.



वाईत खासदारकीच्या जोडीला मंत्रिपद : वाई विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रतापराव भोसले, राष्ट्रवादीचे मदनराव पिसाळ यांनी मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर आजपर्यंत वाई तालुक्याला मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती. मागील तीन टर्म आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांनी सलग चौथ्यांदा विजय मिळविला. राज्यसभेचा राजीनामा देऊन उदयनराजेंनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या रिक्त जागी अजित पवार यांनी आमदार मकरंद पाटलांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवलं. आता मकरंद पाटलांना मंत्रिपद देऊन अजित पवार यांनी वाईत डबल धमाका केला आहे.


जयकुमार गोरेंना सोलापूरचं पालकमंत्रिपद? :माण मतदार संघात विजयी चौकार मारणाऱ्या आमदार जयकुमार गोरेंची मंत्रिमंडळात एन्ट्री झाली आहे. २००९ पूर्वी अनेक वर्ष हा मतदारसंघ राखीव होता. मतदारसंघ खुला झाल्यानंतर एका पोटनिवडणुकीत आमदार जयकुमार गोरे हे पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर सलग तीनवेळा ते निवडून आले आहेत. गंभीर फौजदारी गुन्ह्यांमुळं आमदार गोरे हे नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. आता मंत्रिपदाबरोबरच त्यांना सोलापूरचं पालकमंत्रिपद दिलं जाणार असल्याचं समजतंय.



पाटणच्या नेत्यांना अनेकदा संधी : दुर्गम आणि डोंगराळ पाटण तालुक्याला अनेकवेळा मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांनी अनेक खात्यांची मंत्रिपदं भूषविली होती. त्यांच्या नंतर विक्रमसिंह पाटणकर हे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री होते. पाटणकरांचा पराभव करून २००४ मध्ये शंभूराज देसाई पहिल्यांदा आमदार झाले. पुढच्याच (२००९) निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग तीन निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. २०१९ ला महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदा गृहराज्यमंत्री, तर एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये उत्पादन शुल्क (कॅबिनेट) आणि सातारा, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालंय.



मंत्री कुणीही असो, कंट्रोल फडणवीसांचाच? : महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांना मोठी भूमिका आणि जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. कोणत्याही मंत्र्यांमुळं सरकार अडचणीत येऊ नये, याची ते पुरेपूर काळजी घेणार आहेत. भाजपाला भविष्यात स्वबळावर सत्तेवर यायचं आहे. त्यामुळं मुख्यमंत्री म्हणून फडणवीस हे कोणताही निर्णय वादग्रस्त ठरणार नाही, याकडं कटाक्षानं लक्ष देतील. तसेच मंत्र्यांना ते मनमानी करू देणार नाहीत. प्रशासनावर आपलाच कंट्रोल ठेवतील, असं राजकीय विश्लेषक स्पष्ट करत आहेत.

हेही वाचा -

  1. महायुतीत गेल्या सरकारमधील 'या' मंत्र्यांना मंत्रिपदासाठी फोन नाहीच; मंत्रिमंडळातून डच्चू?
  2. फोन आला का? मंत्रिपद शपथविधीपूर्वी महायुतीच्या नेत्यांची उडतेय धांदल
  3. विरोधकांचा संविधानावर विश्वास नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details