मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं आपल्या पक्षाचे विधिमंडळ गटनेतेपदाची निवड केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा आपल्या गटनेतेपदाची निवड केली. शिवसेनेच्या (उबाठा) नवनिर्वाचित 20 आमदारांची आज (25 नोव्हेंबर) बैठक मातोश्रीवर पार पडली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, बैठकीत विधिमंडळ गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली. तर गेल्यावेळी प्रतोद राहिलेले सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली. तर आदित्य ठाकरे यांची सभागृह नेता म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान, या निवडीनंतर शिवसेनेच्या (उबाठा) नवनिर्वाचित 20 आमदारांनी विधिमंडळ सचिवांची भेट घेतली.
सचिवांना पत्र दिलं :"नवनिर्वाचित 20 आमदारांची मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत गटनेते, प्रतोद आणि सभागृह नेता यांची निवड करण्यात आली. या निवडीबाबतचं पत्र आम्ही विधिमंडळ सचिवांची भेट घेऊन त्यांना दिलं," अशी माहिती शिवसेनेचे (उबाठा) विधिमंडळ गटनेते भास्कर जाधव यांनी दिली. विधिमंडळ सचिवांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, सर्व आमदारांनी सचिवांची भेट घेतल्यानंतर विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी आदित्य ठाकरे, महेश सावंत, सुनिल प्रभू, सचिन अहिर आदी आमदार उपस्थित होते.
माहिती देताना भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे (Source - ETV Bharat Reporter) विरोधी पक्षनेते पदावर चर्चा : यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, "आम्ही विधिमंडळ सचिवांची भेट घेतली आणि विरोधी पक्षनेते पदासाठी काय नियम असतात? काय निकष असतात? याबाबत चर्चा केली. तसंच विरोधी पक्षनेते पदासाठी किती संख्याबळ लागतं? याची काय प्रक्रिया असते? आणि याचा कायदा काय आहे? याची आम्हाला माहिती द्या, अशी मागणी आम्ही सचिवांकडे केली. मात्र, सचिवांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं." विरोधी पक्ष नेतेपदासाठी 29 आमदारांचं संख्याबळ पाहिजे असताना तुम्ही विरोध पक्षनेते पदावर कसा काय दावा करणार? असा प्रश्न भास्कर जाधव यांना विचारला असता ते म्हणाले, "सध्या महाविकास आघाडीमध्ये आमच्याकडेच 20 आमदार आहेत. विरोधी पक्षांमध्ये पदासाठी काय नियम असतात? काय प्रक्रिया असते? आम्ही त्याबाबत अभ्यास करू, चर्चा करू."
निकालात काळबेरं :"निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या विरोधात जनतेचा रोष होता, संताप होता. सर्वांना वाटत होतं की, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल. परंतु, तसं झालं नाही. कोकणात आमचे अनेक आमदार पराभूत झाले. कोकणात मी निवडून आलो, हे मी माझं सुदैव समजतो. सातारा, कोल्हापूर येथेही महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. परंतु, ज्या पद्धतीनं निकाल लागला, मतदान यंत्रणा राबवली गेली, ते पाहता ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड आहे," असा संशय भास्कर जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा
- मनसेच्या उमेदवाराला केवळ दोनच मत? पराभवासाठी ईव्हीएमवर संशयाचे बोट योग्य की अयोग्य?
- "ट्रम्पेटमुळं मला फायदा झाला"; शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटलांचं विधान, राम शिंदेंचे आरोप फेटाळले
- अमरावती जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांचा देवेंद्र फडणवीस यांनी केला सत्कार