पुणे EVM Strongroom : बारामती लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम मशिन्स ज्या स्टाँग रुममध्ये ठेवण्यात आल्या होत्या, त्या रुमचा सीसीटीव्ही काही वेळासाठी बंद झाल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर आता शिरुर लोकसभा मतदारसंघात देखील सीसीटीव्ही डिस्प्ले हे 24 तास बंद झाल्याचं सांगण्यात येतंय. आता यावर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्रतिक्रिया दिलीय, यात कसलंही तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले जिल्हाधिकारी : लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील चारही मतदार संघात स्ट्रॉंग रुम तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक स्ट्रॉंग रुम बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून उमेदवारांकडून सीसीटीव्हीद्वारे या स्ट्रॉंग रुमवर नजर ठेवण्यात येत आहे. यावर जिल्हाधिकारी दिवसे म्हणाले की, स्ट्रॉंग रुम सील करण्यापूर्वीच सीसीटीव्ही लावले जातात. ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रुम जवळ तीन पोलीस बंदोबस्तासाठी असतात. सर्व गोष्टींचं चित्रीकरण केलं जातं आणि ते पाहण्यासाठी बाहेर एक टीव्ही ठेवला जातो. शिरुरबाबत ही सर्व पूर्तता केलेली होती. शिरुरबाबत उमेदवारांचे प्रतिनिधी यांना चित्रीकरण पाहायचं असेल, तर त्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली होती. पण सुरुवातीच्या काही दिवस प्रतिनिधी देण्यात आले नव्हते. आता ते देण्यात आले आहेत. शिरुर स्ट्रॉंग रुम बाबत ज्या बातम्या येत आहेत, त्यात कुठलंही तथ्य नसल्याचं जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितलंय.