मुंबई-माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. "मंदिर आणि मशिद करून फायदा होत नाही," असा शरद पवार यांनी भाजपाला टोला लगावला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीतल्या देशभरातल्या जागांचा कल लक्षात आल्यानंतर एनडीएसह 'इंडिया' आघाडीने सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश या राज्यांना सत्ता स्थापनेच्या दृष्टीने महत्त्व आलं आहे. 'इंडिया' आघाडीच्या वतीने सर्व चर्चा करण्याचे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार घेतली.
वेळ पडल्यास चर्चा करू-बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीत येण्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. आघाडीत सहभागी झाल्यास देशाचं उपपंतप्रधानपद सोपवण्याचा प्रस्ताव नितीश कुमार यांना देण्यात आल्याच्या चर्चा रंगायला लागल्या आहेत. याबाबत तपशील ठरवण्याचे अधिकार शरद पवार यांना देण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी आपली आतापर्यंत मल्लिकार्जुन खरगे आणि सीताराम येचुरी वगळता कुणाशीही चर्चा झाली नसल्याची माहिती दिली. मात्र वेळ पडल्यास चर्चा करू, हे बोलायलाही पवार विसरले नाहीत.