मुंबई Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांसाठी आता सर्व पक्षांच्या जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यावर आलेली आहेत. आचारसंहिता केव्हाही जाहीर होईल, अशी परिस्थिती असताना सर्वच पक्षांनी आता आपापल्या परंपरागत मतदारसंघावर दावा ठोकायला सुरुवात केलीय. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे. मात्र या जागा महायुती म्हणून जिंकणार की, भारतीय जनता पार्टी म्हणून याबाबत अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमात आहेत. महायुतीतील घटक पक्षांनी आपापल्या परंपरागत मतदार संघांवर दावा ठोकल्यानं भारतीय जनता पक्ष ही या मतदार संघासाठी आग्रही आहे. त्यामुळं महायुतीमध्ये आता जागा वाटपावरून तणाव वाढू लागला आहे.
कोणकोणत्या जागांवरून तणाव: महायुतीमधील घटक पक्षाकडं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडं रायगडची जागा आहे. सुनील तटकरे येथे विद्यमान खासदार आहेत. मात्र भारतीय जनता पक्षानं या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये या जागेवरून तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाकडं सध्या कोल्हापूर, हातकणंगले, या जागा आहेत. त्याचसोबत अन्य 11 जागा ही शिंदे गटाकडं आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं पाच खासदार आहेत. मात्र महायुतीत शिंदे गटाकडं असलेल्या बहुतांश जागांवर भाजपाने दावा सांगितला आहे.
जागांवरून आता युतीमध्ये तणाव : भारतीय जनता पक्षाने कोल्हापूर, हातकणंगले, रामटेक शिरूर, मावळ या जागांवर दावा केला आहे. यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपाने दावा केला आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा सांगत आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या लोकसभा मतदारसंघांवर ही भाजपाने आता दावा केला आहे. छत्रपती संभाजीनगरातून भारतीय जनता पार्टीने भागवत कराड यांना मैदानात उतरवण्याची तयारी चालवली आहे. तर दुसरीकडं शिंदे गटाच्या वतीनं संदिपान भुमरे हे संभाव्य उमेदवार आहेत. हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहेत. तर या जागेवर आता भारतीय जनता पक्षानेही दावा केला आहे. त्यामुळं या जागांवरून आता युतीमध्ये तणाव वाढू लागला आहे. त्यातच माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर निवडणूक लढवण्यास तयार असताना, या जागेवर भाजपाच्याच मोहिते पाटील यांनी दावा सांगितला आहे. त्यामुळं आता माढ्याचा प्रश्नही भाजपासाठी चिंतेचा ठरणार आहे.