नालासोपारा : नालासोपाऱ्यात बॉडी स्प्रे च्या बाटल्यांचा भीषण स्फोट (Perfume Bottle Explosion In Nalasopara ) झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण (4 people seriously injured) होरपळून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
नेमकं काय घडलं? : नालासोपारा (Nalasopara) पूर्वच्या संकेश्वरनगरमधील रोशनी अपार्टमेंटच्या रूम नंबर 112 येथे सुगंधी द्रव्याच्या (बॉडी स्प्रे) बॉटल भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक स्फोट झाला, अशी माहिती आचोळे पोलिसांनी दिलीय. या घटनेची माहिती मिळताच आचोळे पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींमध्ये महावीर वडर (वय 41) त्यांच्या पत्नी सुनिता वडर, मुलगी हर्षदा आणि 9 वर्षाीय मुलगा हर्षवर्धन वडर यांचा समावेश आहे. यातील मुलगा हर्षवर्धन याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय.
स्फोटाचं कारण काय? : नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, परफ्यूम बॉटलवरील तारखा संपल्या होत्या. त्या भंगारात देण्यासाठी त्या खाली करण्याचं काम सुरू होतं. याच दरम्यान परफ्यूममधील ज्वालाग्रही पदार्थाचा घरात स्वयंपाक बनवत असताना आगीशी संपर्क झाला आणि भीषण स्फोट झाला. दरम्यान, या घटनेनंतर शेजारील नागरिक भयभीत झाले असून परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. तर या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
हेही वाचा -