छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : "राष्ट्रवादी काँग्रेस (एस पी) पुढील एका महिन्यात कुठं राहील माहीत नाही. मागील महिन्याभरात त्यांच्या नेत्यांनी महविकास आघाडी म्हणून कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. खासदारांना संपर्क झाल्याची माहिती आहे. एकदम स्फोट करण्यापेक्षा महिनाभरात परिणाम दिसून येतील," असं सूचक वक्तव्य मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केलंय. तर ''राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोबत येत असली तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (उबाठा) आम्ही टाळी मारण्याची संधी देणार नाही. त्यांना इच्छा असेल तर त्यांनी हात पुढे करावा मग पाहू," असं देखील शिरसाट म्हणालेत.
राष्ट्रवादी महिनाभरात सोबत? : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिनाभरात एकत्र येऊ शकतात, असं मत मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय. ते म्हणाले, "त्यांना पक्ष बदलाची सवय आहे. याआधी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले, नंतर त्यांच्यासोबतच गेले. आयुष्यभर ज्यांच्या विरोधात राहिले अशा ठाकरेंसोबत गेले. इतकंच नाही तर पहाटेचा शपथविधी त्यांनी केलाय. त्यामुळं त्यांचा वेगळा अजेंडा पाहायला मिळेल. यासंदर्भात त्यांचे फोन झालेत. मात्र, तातडीनं स्फोट न करता महिनाभरात परिणाम दिसतील. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, आमची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. त्यात बदल घडणार नाही", असं देखील शिरसाट यांनी सांगितलं.
माशासारखे तडफडत असल्यानं हालचाली : पुढं ते म्हणाले, "राष्ट्रवादी कॉंग्रेसने (शरदचंद्र पवार) मागील महिनाभरात कुठलीही टीका केली नाही. त्यांची दिशा पाहून आता उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधत आहेत. 'साथ मिलके काम करेंगे' असं ते म्हणताय. याचा अर्थ ते आता थकले आहेत." तसंच जे टोमणे त्यांनी मारले त्याचा परिणाम मतदारांवर झाला नाही. माशासारखे तडफडण्यापेक्षा समुद्रात उडी मारण्याचा योग्य पर्याय असल्यानं ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधत असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली.
आता टाळी नाही : "दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असला तरी उद्धव ठाकरे यांनी टाळी देण्याची संधी गमावली आहे. आता त्यांनी बोलावं आणि विधान करावं. आम्ही पाहणार नाही किंवा संधी देणार नाही. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला (उबाठा) सोडणार आहे. मग यांच्यासोबत जाण्याची चर्चा कशाला? उगाच त्यांना भाव देण्यात अर्थ नाही. त्यांना आता जाणीव झाली पाहिजे. ते आता फडणवीसांचे गुणगान गात आहेत. सरड्यासारखी भूमिका महाराष्ट्रानं पाहिलीय. शिवसेनेत भवितव्य नाही, असं उद्धव ठाकरे म्हणत असतील तर त्यांनी स्वतःचं भवितव्य पाहावं. आमचे 40 चे 60 झाले तुमचे किती झाले? याची चाचपणी करा," अशी जहरी टीका संजय शिरसाट यांनी केली.
हेही वाचा -
- संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे असल्यास त्यांच्यावरही कारवाई करणार- मंत्री संजय शिरसाट
- "तुम्हाला जमत नसेल तर सांगा दुसरे अधिकारी आणू"; शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले
- महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडी ? : शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न, आरोप प्रत्यारोपावरुन रंगलं राजकारण