पुणे : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची गेल्या महिन्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरत रान उठवलंय. तसंच या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव आलं असून ते मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू असल्यानं मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडलेत. यावरुन विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सत्ताधारी आमदारही यामध्ये काही कमी नाहीत. यावरच आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? : विभागीय आयुक्त कार्यालय पुणे इथं आज (10 जाने.) चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "आपण वस्तूस्थितीवर गेलं पाहिजे. आज धनंजय मुंडे यांचं नाव डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तपासामध्ये कुठंही येत नाही. जेव्हा नाव तपासात येईल, तेव्हा आम्ही कोणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणालेत. या प्रकरणातील आरोपी कोर्टातून सुटणार नाही, यासाठी सरकार काम करतंय. योग्य तो तपास सुरू आहे. कोणत्याही प्रकरणात डायरेक्ट मंत्र्यावर आरोप करण्यापेक्षा वस्तूस्थिती वर बोललं पाहिजे. यात जर मंत्री दोषी असेल तर ते राजीनामा देतील."
कोणीही राजकारण करू नये : पुढं बावनकुळे म्हणाले, "मी स्वतः सुरेश धस यांना भेटलोय आणि उद्याही भेटणार आहे. या प्रकरणात राजकारण आमच्याकडून किंवा कोणाकडूनही झालं तर तपासाला वेगळं वळण मिळेल. आपल्या विरोधी पक्षाची आणि सर्वांची जबाबदारी आहे की, या प्रकरणामध्ये जागृत राहिलं पाहिजे. आरोपीला शिक्षा मिळावी यासाठी सगळ्यांनी एकजूटपणे काम केलं पाहिजे. या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये. तसंच मला या प्रकरणात कोणावरही आरोप करायचा नाही. मात्र, आरोपीला मदत व्हायला नको", असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
- उत्तम जानकरांची धनंजय मुंडेंवर टीका; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर मैदानात, म्हणाल्या 'वैचारिक मानसिकता खालावली'
- संतोष देशमुख हत्याकांड; बीड प्रकरणावरुन धनंजय मुंडेंना लक्ष्य करणं चुकीचं: लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला, 'हा' दिला इशारा
- संतोष देशमुख कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागणं हे दुर्दैवी; संभाजीराजेंचं टीकास्त्र