चंद्रपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मारोतराव कन्नमवार यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या गैरहजेरीची सध्या उलटसुलट चर्चा रंगली आहे. यावरच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिलीय.
अंतर्गत वाद चव्हाट्यावर : सुधीर मुनगंटीवार यांना यंदा मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आणि भाजपाच्या गोटात असलेल्या अंतर्गत वादाच्या चर्चेला पेव फुटलं. अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मत्स्य संवर्धन मंत्री पदाची धुरा त्यांनी सांभाळली. तसंच मागील दहा वर्ष ते सातत्यानं चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र, यावेळी त्यांना मंत्रिपद न मिळाल्यानं भाजपामध्ये असलेली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. मंत्रिमंडळाची घोषणा होण्यापूर्वी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांना फोन करून सविस्तर माहिती दिली होती, असं स्पष्ट केलं होतं. तर मुनगंटीवार यांनी मात्र मंत्रिमंडळात आपलं नाव नसल्याची स्पष्ट अशी माहिती मला देण्यात आली नव्हती, असं उत्तर दिलं. हा कलह क्षमल्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपाच्या अंतर्गत वादाला पेव फुटलंय. त्याला निमित्त होतं ते माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचं.
राजकीय चर्चांना उधाण : मारोतराव कन्नमवार यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आज (10 जाने.) शहरातील प्रियदर्शनी सभागृहात शतकोत्तर रौप्य समितीच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष किशोर जोरगेवार होते. हा कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार की नाही यावर कुजबूज सुरू झाली होती. आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, भाजपाचे आमदार देवराव भोंगळे, स्थानिक आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. मात्र, मुनगंटीवार कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत आणि पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "यात कुठल्याही वादाची, नाराजीची पार्श्वभूमी नसून आपण स्वतः मुनगंटीवार यांच्याशी फोनवर बोललोय. त्यांनाही कार्यक्रमात उपस्थित राहण्याची इच्छा होती. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळं ते येऊ शकले नाहीत." त्यामुळं नाराजीचा कुठलाच प्रश्न नाही, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -