पुणे - शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्ह्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. असं असताना पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत पैशाच्या वादातून डब्ल्यूएनएस या कंपनीत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याने कंपनीच्या पार्किंगमध्येच शुभदा कोदारे हिची हत्या केली. आता या शुभदा कोदारे खून प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली असून पुढील दोन दिवसात आयोगाने संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला आहे.
महिला आयोगाचे आदेश - निर्धारित वेळेत या घटनेचा तपास करण्याचे राष्ट्रीय महिला आयोगाने आदेश दिले आहेत. पुढील दोन दिवसात या घटने संदर्भातील एफआयआर तसंच कारवाई केलेल्याचा संपूर्ण अहवाल आयोगाला पाठवण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. तीन दिवसांपूर्वी पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा कोदारे या तरुणीचा तिच्याच मित्राने आर्थिक वादातून खून केला होता आणि या प्रकरणाचा व्हिडिओ देखील काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आर्थिक वादातून कृष्णा कनोजा या तरुणाने शुभदावर धारदार शस्त्राने वार करत हल्ला केला होता. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शुभदाचा खोटारडेपणा उघड - शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनीमध्ये कार्यरत होते. शुभदाने वडील आजरी आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे असं सांगून कृष्णाकडून कधी २५ हजार तर कधी ५० हजार असे एकूण ४ लाख रुपये उकळले. एवढ्यावर न थांबता शुभदा आणखी पैसे कृष्णाला मागू लागल्यानं त्याचा संशय बळावला आणि कृष्णाने थेट शुभादाचे मूळ गाव कराड गाठले. तिच्या घरी जाताच कृष्णाच्या पायाखालची वाळू सरकली. तिचे वडील अगदी ठणठणीत होते. कृष्णाने त्यांना विचारले असता मी आजारी नाही आणि माझ्यावर कुठलीही शस्त्रक्रिया केली गेली नाही आणि होणार नाही असं त्यांनी सांगितलं. सत्य समोर आल्यावर कृष्णाने शुभदाकडे पैसे परत मागण्याचा तगादा लावला. यातून त्यांची अनेकवेळा वादावादी सुद्धा झाली आणि तीन दिवसापूर्वी कृष्णाने शुभदा हिला अद्दल घडावी हा मानस ठेवत थेट कंपनीच्या पार्किंगमध्ये तिला गाठले आणि तिच्या हातावर वार केला. या हल्ल्यात शुभदा हिच्या उजव्या हाताच्या नसा तुटल्या. या हल्ल्यानंतर तिची शुगर कमी झाली परिणामी तिचे रक्त गोठले जाण्याची प्रक्रिया न झाल्यानं मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि यात तिचा मृत्यु झाला.
हेही वाचा....