सातारा - झारखंडमधील नक्षलग्रस्त भागात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका हिंसाचाराशिवाय पार पाडल्याबद्दल राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून झारखंडचे आयजी अमोल होमकर यांचा निवडणूक आयोगाच्यावतीनं प्रजासत्ताकदिनी सन्मान करण्यात येणार आहे. आयजी होमकर हे साताऱ्यातील कराडचे सुपुत्र आहेत. उल्लेखनीय सेवेबद्दल मागील वर्षी त्यांना राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं.
सन्मानार्थी अधिकाऱ्यांत होमकरांचा समावेश - झारखंडमधील लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आठ आयपीएस अधिकाऱ्यांची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील साताऱ्याचे सुपुत्र आणि झारखंडचे आयजी (विशेष पोलीस महानिरीक्षक) अमोल होमकर यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी निवडणूक काळात चोख सुरक्षा राखून नक्षलग्रस्त भागात हिंसाचाराशिवाय निवडणुका पार पाडल्या होत्या.
राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य - देशात २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचं औचित्य साधून निवडणूक काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ८ आयपीएस अधिकारी आणि ४४ पोलीस अधिकाऱ्यांना झारखंड निवडणूक आयोग प्रजासत्ताकदिनी राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करणार आहे. त्यात सातारा जिल्ह्यातील कराडचे सुपुत्र अमोल होमकर (आयजी झारखंड) यांचाही समावेश आहे.
टिळक हायस्कूलचे विद्यार्थी - अमोल होमकर यांचं माध्यमिक शिक्षण कराडमधील टिळक हायस्कूलमध्ये झालं. अमोल होमकर हे १९८८ ते १९९३ दरम्यान कराडच्या टिळक हायस्कूलचे विद्यार्थी होते. सहावीत असताना ते आदर्श विद्यार्थी ठरले होते. दहावीच्या परीक्षेत बोर्डात ते सातवे आले होते. बॅडमिंटन संघातही त्यांची निवड झाली होती. त्यांची गुणवत्ता आणि वर्तणूक चांगली होती. मनमिळाऊ स्वभावामुळे ते शिक्षकांचे लाडके विद्यार्थी होते. तीन वर्षापूर्वी त्यांना माजी विद्यार्थी सेवा संघाने विद्याभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्रासह, सातारा, कराडची मान उंचावली असल्याची प्रतिक्रिया टिळक हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. फणसळकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. कराडच्या यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयातून शास्त्र शाखेतून त्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सांगलीच्या वालचंद महाविद्यालयातून त्यांनी बी. ई. मॅकॅनिकलची पदवी घेतली. आयपीएस होण्याच्या जिद्दीनं त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
बापूजी साळुंखे केंद्राचं मार्गदर्शन - अमोल होमकर यांनी कराडमधील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. बी. एस. खोत यांचं मार्गदर्शन घेतलं. त्यानंतर दिल्लीला जाऊन त्यांनी युपीएससीची तयारी सुरू केली. २००४ मध्ये ते आयपीएस झाले. त्यांना झारखंड केडर मिळालं. अमोल होमकर यांचे वडील विनुकांत होमकर हे एक्साईज खात्यात अधिकारी होते.
हेही वाचा....